घोटाळ्यातील आरोपी संतोष राठोड याला कारागृहात भ्रमणभाष संच पुरवला गेला !
संभाजीनगर – राज्यभरात गाजलेल्या ३०-३० घोटाळ्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मागवली आहे. त्यातच आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणारी माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड सध्या हर्सूल कारागृहात असून त्याला भ्रमणभाष संच पुरवला जात असल्याचे समोर आले आहे. त्याने केलेल्या एका दूरभाषच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहे. ज्यात ‘ईडी’ने माहिती मागवल्याविषयी चर्चा झाली आहे. त्यामुळे संतोष राठोड न्यायालयीन कोठडीत असतांना त्याला भ्रमणभाष संच कोण पुरवत आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१. याविषयी कारागृहाचे मुख्य अधिकारी अरुणा मुगूटराव म्हणाले, ‘‘१६ जानेवारी या दिवशी संतोष राठोड याला सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत न्यायालयात उपस्थित करण्यासाठी नेण्यात आले होते. त्या वेळी हे संभाषण झाले असावे.’’
२. हे संभाषण कारागृहातून झाले असेल किंवा न्यायालयात उपस्थित करतांना झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संतोष राठोड याला न्यायालयात घेऊन जात असतांना संभाजीनगर शहर पोलिसांचा १ अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांनी हे संभाषण करू दिले का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
३. कारागृह प्रशासन किंवा शहर पोलीस याचे उत्तर देऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष राठोड याने संभाषण केलेला व्यक्ती हा त्यांचा नातेवाईक आहे.
४. विशेष म्हणजे या व्यक्तीची राजकीय पार्श्वभूमी असून एका मंत्र्याच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकाराची पोलीस चौकशी करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३०-३० घोटाळा प्रकरण काय आहे ?
मराठवाड्यात समृद्धी महामार्ग आणि डी.एम्.आय.सी. या प्रकल्पांमुळे कोट्यवधी रुपयांचा मोबदला शेतकर्यांना मिळाला होता. हेच लक्षात घेत संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने शेतकर्यांना ‘माझ्याकडे पैसे गुंतवा आणि मासिक ३० टक्के परतावा मिळवा’, अशी योजना आणली. प्रारंभी काही नातेवाइकांना या योजनेत घेऊन त्यांना चांगला परतावा दिला. त्यानंतर अनेक शेतकर्यांनी यात पैसा गुंतवला. यातून कोट्यवधी रुपयांची माया राठोड याने जमा केली; मात्र काही दिवसांनी त्याने व्याज देणे बंद केले, तसेच अनेकांनी गुंतवणूक केलेले मागितलेले पैसे परतही केले नाहीत. यामुळे राठोड याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.