नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्‍याच्‍या वरिष्‍ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी !

आमदारांच्‍या मागणीनंतर कारवाई !

नाशिक – नाशिक शहर पोलीस दलातील अंबड पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची १९ जानेवारी या दिवशी उचलबांगडी करण्‍यात आली आहे. नागपूर येथे डिसेंबर २०२२ मध्‍ये पार पडलेल्‍या हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लक्षवेधी मांडून भगीरथ देशमुख यांच्‍या संदर्भातील तक्रारीची चौकशी करण्‍याची मागणी केली होती. त्‍यावर उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

२० दिवसांनी चौकशी चालू होणार असून त्‍या अगोदर शहराचे पोलीस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी देशमुख यांचे पोलीस मुख्‍यालयातील नियंत्रण कक्षात स्‍थानांतर केले आहे. अपर पोलीस महासंचालकांकडून ही चौकशी केली जाणार आहे. निष्‍पक्ष चौकशी व्‍हावी, यासाठी हे स्‍थानांतर केल्‍याचे सांगितले जात आहे.

‘वाढती गुन्‍हेगारी, आर्थिक सूत्रांविषयी होणारी वसुली आणि तक्रारदाराकडेच लाच मागितल्‍याचा आरोप भगीरथ देशमुख यांच्‍यावर आहे’, असे सूत्र राणे यांनी सभागृहात उपस्‍थित केले होते. भगीरथ देशमुख यांच्‍याविषयी पोलीस ठाण्‍यातील पोलीस कर्मचारीही समाधानी नव्‍हते. मोजक्‍याच कर्मचार्‍यांना हाताशी धरून कामे करून घेणे आणि इतरांना उर्मटपणे बोलणे अशा विविध तक्रारीही करण्‍यात आल्‍या होत्‍या.

संपादकीय भूमिका 

  • आमदारांना कारवाई करण्‍याविषयीची मागणी का करावी लागते ? वरिष्‍ठ पोलीस अधिकारी काय करतात ?
  • एखाद्या आमदाराने मागणी केल्‍यानंतर पोलीस अधिकार्‍याची चौकशी होण्‍याऐवजी त्‍यांच्‍या वर्तनाचा अभ्‍यास करून आणि इतर पोलीस कर्मचार्‍यांनी केलेल्‍या तक्रारींची माहिती घेऊन पोलीस अधीक्षकांनीच भगीरथ देशमुख यांना बडतर्फ करायला हवे होते.