स्‍वत:चे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर नराधमांवर ‘श्रद्धा’ ठेवणे सोडा !

‘मागील काही दिवसांपासून सर्वत्र केवळ ‘श्रद्धा वालकर-आफताब पूनावाला प्रकरण’ म्‍हणजेच ‘श्रद्धा वालकर हत्‍या प्रकरण’, ही एकच चर्चा चालू आहे. जे घडले, ते अतिशय भयंकर असून यातूनही जर आज आपण धडा घेतला नाही, तर आज एका मुलीचे ३५ तुकडे मिळाले, पुढे न जाणे किती मुलींचे किती तुकडे हाती येतील ? हे ऐकून अंगावर शहारा येतो; मात्र ‘लव्‍ह जिहाद’ हे भीषण सत्‍य स्‍वीकारणे आणि त्‍यावर त्‍वरित उपाययोजना काढणे अत्‍यावश्‍यक आहे. त्‍यामुळे स्‍वत:चे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर नराधमांवर ‘श्रद्धा’ ठेवणे सोडा आणि हिंदु मुलींनो, त्‍वरित सावध व्‍हा !

१. आफताबच्‍या प्रेमात पडणारी ‘स्‍वतंत्र’ विचारांची श्रद्धा !

श्रद्धा वालकर…! २७ वर्षांची तरुणी. नोकरी करणारी, कमावणारी, आजच्‍या जगातील ‘इंडिपेंडेंट’ (स्‍वतंत्र), स्‍वत:ची मते आणि अनेकदा टोकाची मते असलेली मुलगी. श्रद्धा २५ वर्षांची असतांना पालघर येथील तिचे घर सोडून मुंबईत नोकरीच्‍या शोधात येते. एका बहुराष्‍ट्रीय आस्‍थापनेच्‍या ‘कॉल सेंटर’मध्‍ये तिला नोकरी लागते आणि तेथेच तिला भेटतो आफताब आमीन पूनावाला हा २८ वर्षीय तरुण. त्‍याच्‍याशी तिची मैत्री होते. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि दोघे एकत्र रहाण्‍याचा निर्णय घेतात.

निहारिका पोळ-सर्वटे

२. स्‍वतःच्‍या आई-वडिलांचा विरोध डावलून त्‍यांना ‘मेरा अब्‍दुल अलग है’ या पठडीतील उत्तरे देणे अंगलट !

यानंतर श्रद्धा तिच्‍या घरी जाते. तिच्‍या आईला तिच्‍या या प्रेमप्रकरणाविषयी सांगते. तिच्‍या आईचा या प्रकरणाला कडाडून विरोध असतो. ‘मुलगा मुसलमान आहे, आपल्‍याकडे हे चालणार नाही’, हे आई तिला स्‍पष्‍टपणे सांगते; मात्र श्रद्धा ऐकत नाही. श्रद्धाचे वडील तिच्‍या परिवारापासून वेगळे रहात असतात. त्‍यांनाही या प्रकरणाची कल्‍पना दिली जाते. तेही यास तितकाच कडाडून विरोध करतात. त्‍यावर श्रद्धा उर्मटासारखे ‘मी २५ वर्षांची असून माझे निर्णय मला घेता येतात आणि तुम्‍हाला ते मान्‍य नसतील, तर समजा आजपासून तुमची मुलगी मेली’, असे अत्‍यंत उद़्‍धटपणे उत्तर देते आणि निघून जाते. तिला कल्‍पनाही नसेल की, येत्‍या काही काळातच तिचे हे बोल खरे ठरणार आहेत !

३. श्रद्धाला लग्‍न हवे होते आणि आफताबला नको, हेच श्रद्धाचे तुकडे होण्‍यामागील कारण !

अगदी ‘मेरा अब्‍दुल अलग है ।’, या पठडीतील ती उत्तरे देते. लहानपणीपासून ‘मजहब नहीं सिखाता आपस मैं बैर रखना’, हे मानत आलेल्‍या श्रद्धाची आफताबवर अंधश्रद्धा जडते आणि पुढे हीच अंधश्रद्धा तिचे अक्षरश: तुकडे करते. त्‍याचे एकमेव कारण श्रद्धाला लग्‍न हवे होते आणि आफताबला नको. एवढे एक कारण आफताबसाठी थंड डोक्‍याने श्रद्धाचा खून करण्‍यासाठी पुरेसे होते. तिला मारून टाकण्‍यासाठी आणि एवढेच नव्‍हे, तर कसायाप्रमाणे तिचे ३५ तुकडे करण्‍यासाठी. हे सर्वस्‍वी भीषण आहे.

४. श्रद्धाच्‍या हत्‍येमागे ‘धर्म’ हाच मुख्‍य आधार !

देहलीत झालेल्‍या श्रद्धाच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणातील धार्मिक पैलू अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही; कारण धर्म या गुन्‍ह्याचा मुख्‍य आधार आहेच. तो नाकारून चालणारच नाही. त्‍यामुळे ‘सगळीच मुलसमान मुले सारखी नसतात’, ‘हिंदु मुलींशी लग्‍न केल्‍यावर मुसलमान तरुणांचे काय होते ?, हे कुठे समोर येते’, वगैरे म्‍हणणार्‍यांना थोबाडीत मारणारे हे प्रकरण आहे. या हत्‍येत जे झाले, त्‍याच्‍या परिणामांपेक्षाही त्‍यामागील कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

५. अनेक प्रश्‍न अनुत्तरित !

या संपूर्ण प्रकरणामुळे पुढील प्रश्‍न उपस्‍थितीत होतात –

५ अ. आफताबद्वारे सतत मारझोड करूनसुद्धा (श्रद्धाच्‍या वडिलांनी नोंदवलेल्‍या प्रथमदर्शी अहवालानुसार) श्रद्धाने तिच्‍या आई-वडिलांकडे न जाता, घरी न परतता त्‍या नराधमासमवेत रहाणेच का पसंत केले असेल ?

५ आ. श्रद्धाने आफताब पूनावालामध्‍ये असे काय पाहिले असेल की, तिला तिचे कुटुंब, मित्र आणि एक ‘सुरक्षित’ आयुष्‍यही नकोसे झाले असेल ? कि ती त्‍या २ वर्षे ओळख असलेल्‍या आफताबसमवेत देहलीतील मेहरौली या अतिशय अनोळखी ठिकाणी येऊन रहाण्‍यासाठी सिद्ध झाली असेल ?

५ इ. तिला तिच्‍या कुटुंबाप्रती विश्‍वास वाटला नसेल का ? कुटुंबात तिला सुरक्षित न वाटता त्‍या माणसासमवेत (आफताब समवेत) तिला सुरक्षित कसे वाटू शकते ? जो तिच्‍या शरीराचे तुकडे करतो, ते शीतकपाटात ठेवतो, त्‍याच शीतकपाटातून पाणी आणि दूध काढून चहा बनवतो. किती भयंकर आहे ! तिला याची पुसटशीही कल्‍पना नसेल का की, हा माणूस तिच्‍या जिवासाठी घातक आहे ?

५ ई. मुसलमान मुलांमध्‍ये आकर्षित करणारे असे काय आहे की, मुली वेड्यापिशा होऊन स्‍वत:चे धर्मांतर करण्‍यापासून ते जीव देण्‍यापर्यंत सगळे सहन करायला धजावतात ?

प्रश्‍नांची सूची मोठी आहे आणि सर्वच प्रश्‍न अनुत्तरित आहेत. याविषयी आरंभीपासूनच घराघरांमधून कुठल्‍या पद्धतीची काळजी घेणे आवश्‍यक आहे ?

६. श्रद्धा वालकर हत्‍येसारख्‍या घटना टाळण्‍यासाठी पुढील उपाययोजना आवश्‍यक !

संपूर्ण विचारार्थी काही अतिशय महत्त्वाची सूत्रे मांडणे येथे क्रमप्राप्‍त ठरावे.

६ अ. आई-वडील आणि मुले यांच्‍यामध्‍ये मनमोकळेपणाने संवाद हवा ! : प्रत्‍येक घरात संवाद होणे अत्‍यावश्‍यक आहे. आई-वडील आणि मुले यांच्‍यामध्‍ये मनमोकळेपणाने संवाद झाला पाहिजे. स्‍वतःचे घर हे प्रत्‍येक मुलगा किंवा मुलगी यांच्‍यासाठी सर्वांत सुरक्षित ठिकाण असते. ‘आपण चुकीचे निर्णय घेतले, तरी घरातील कुटुंबीय आपल्‍याला त्‍यातून बाहेर पडण्‍यात निश्‍चित साहाय्‍य करतील किंबहुना तेच यातून आपल्‍याला बाहेर काढू शकतील’, हा विश्‍वास असणे आवश्‍यक आहे.

६ आ. श्रद्धा वालकर हत्‍येसारख्‍या घटना आणि त्‍यातील सत्‍य, योग्‍य त्‍या वयात मुलींसमोर आणणे आवश्‍यक ! : आपण आपल्‍या मुलांना कितीही ‘सर्वधर्मसमभाव’ किंवा ‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना’, हे शिकवले, तरीही त्‍यातील धोके, तसेच श्रद्धा वालकर हत्‍येसारख्‍या घटना, त्‍यातील सत्‍य आदी सर्व योग्‍य त्‍या वयात मुलींसमोर आणणे आवश्‍यक आहे. हा संवाद आई-वडिलांकडून न संकोचता झालाच पाहिजे. आपल्‍याकडे अजूनही प्रेम, आकर्षण आदी विषयांवर घरी आई-वडिलांशी मनमोकळेपणाने संवाद होत नाही. तो झाला पाहिजे.

६ इ. मुलींनी धोका पत्‍करू नये ! : मुलींनी स्‍वत:च अतिशय डोळसपणे या सर्व घटनांचा विचार केला पाहिजे. जगात एखादा तरुण असा असेलही की, जो ‘लव्‍ह जिहाद’ या नावाखाली नाही, तर खरोखर प्रेम करतही असेल; परंतु ‘धर्म’ अतिशय कट्टर आहे आणि असे प्रेम स्‍वीकारणे, म्‍हणजे आयुष्‍यातील सर्वांत मोठा धोका आहे, जो अजिबात पत्‍करू नये. ‘यामुळे मी माझ्‍या स्‍वत:च्‍या आई-वडिलांपासून दूर होईन’, ही जाणीव मुलींमध्‍ये असणे आवश्‍यक आहे.

६ ई. ‘लव्‍ह जिहाद’विषयी मुलींपर्यंत योग्‍य त्‍या वयात योग्‍य ती माहिती पोचवा ! : ‘लव्‍ह जिहाद’विषयी मुलींपर्यंत योग्‍य त्‍या वयात योग्‍य ती माहिती पोचली पाहिजे. मुलींना पटवण्‍याच्‍या मुलांच्‍या पद्धती, त्‍याचे दुष्‍परिणाम आणि ‘पुढे आपण एखाद्या सुटकेसमध्‍ये नाही, तर शीतकपाटात बीभत्‍स अवस्‍थेत आढळू शकतो’, याची अंगावर काटा आणणारी भीती मुलींच्‍या मनात असली पाहिजे, जेणेकरून त्‍या या वळणाला लागणारच नाहीत आणि त्‍या परिस्‍थितीशी सामना नको; म्‍हणून ठामपणे या सगळ्‍यापासून लांब रहातील.

७. लव्‍ह जिहादला बळी पडलेल्‍या अनेक ‘श्रद्धां’ची सूची मोठी !

या जाळ्‍यात सापडणारी श्रद्धा ही एकमेव मुलगी नाही. निकिता तोमर जिने तौसिफ नावाच्‍या युवकावर प्रेम केले आणि आपला जीव गमावला, रितू जिने लायक खानवर प्रेम केले, प्रिया जिने शमशेदवर प्रेम केले, मानसी दीक्षित जिने मुजम्‍मिलवर प्रेम केले, शिवानी जिने आरिफ खानवर, तर खुशी परिहार जिने अशरफवर प्रेम केले, सीमा सोनी जिने नदीमवर प्रेम केले, तनिष्‍का जिने महंमद साहिलवर, तर अंतिमा जिने रिझवानवर प्रेम केले, यांतील काही त्‍यांच्‍या रहात्‍या घरी मृतावस्‍थेत आढळल्‍या, तर काही सुटकेसमध्‍ये, काहींनी जीव दिला, तर काहींनी आत्‍महत्‍या केली. जीव गेला तो गेलाच आणि तरीही काही लोक म्‍हणत असतील की, ‘लव्‍ह जिहाद हा एक कटाचा सिद्धांत (कॉन्‍स्‍पीरन्‍सी थिअरी) आहे’, तर येणार्‍या भविष्‍याविषयी काळजी वाटल्‍याविना रहात नाही.

८. ‘बॉलीवूड आणि सामाजिक माध्‍यमे’ घातक असल्‍याचे हिंदु मुलींना वारंवार सांगा !

या सगळ्‍यात बॉलीवूड आणि सामाजिक माध्‍यमे अतिशय हानिकारक ठरू शकतात. वर्षानुवर्षे आपल्‍या मनावर या माध्‍यमांद्वारे बिंबवण्‍यात आले आहे की, अभिनेता शाहरूख खान हा कसा त्‍याची बायको गौरी हिला मान देत आहे, त्‍याने कसे तिचे नावही पालटले नाही, तिचे धर्मांतरही केले नाही इत्‍यादी. मात्र अभिनेता आमीर खान हा २ हिंदु बायका करून दोघींना सोडून देतो, याविषयी कुणीच बोलत नाही. यासह अभिनेते सैफ अली खान याविषयीही असेच आहे. बरं, व्‍यक्‍तीगत आयुष्‍य बाजूला राहू देत; पण ‘पीके’सारख्‍या चित्रपटांमधून ‘सरफराज’ची प्रतिमा निर्माण केली जाते आणि आपल्‍या भोळ्‍या (बावळट) हिंदु मुलींच्‍या मनात ‘मेरा अब्‍दुल वैसा नही है’, हे पक्‍क बसते आणि पुढे त्‍यांची श्रद्धासारखी गत होते. त्‍यामुळे ‘बॉलीवूड आणि सामाजिक माध्‍यमे हे आभासी जग आहे, हे सत्‍य नाही. ते विशिष्‍ट उद्देशाने कार्य करणारे ‘स्‍लो पॉयझनिंग’ (हळूवार दिले जाणारे विष) आहे’, हे हिंदु मुलींना वारंवार सांगणे आवश्‍यक आहे.

९. ‘अन्‍य श्रद्धां’च्‍या हत्‍या होऊ न देण्‍यासाठी हिंदु मुलींना वेळीच सावध करा !

अशी अनेक सूत्रे आहेत की, ज्‍यावर चर्चा झाली पाहिजे आणि घराघरांत संवाद झाला पाहिजे, तर अन् तरच हिंदु मुलींचे रक्षण शक्‍य आहे आणि तेव्‍हाच आपण यापुढे अनेक ‘श्रद्धां’ना वाचवू शकतो, अन्‍यथा आज एका श्रद्धाचे तुकडे शीतकपाटात सापडले, उद्या दुसरी ‘श्रद्धा’ आणखी कुठेतरी सापडेल अन् आपण याविषयी काहीच करू शकणार नाही. अशी शोकांतिका होऊ द्यायची नसेल, तर आज आणि आताच आपल्‍या हिंदु मुलींना सावध करणे आवश्‍यक आहे !’

– निहारिका पोळ-सर्वटे

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’चे वृत्तसंकेतस्‍थळ, १९.११.२०२२)