सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ८ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती
बांदा, ८ जानेवारी (वार्ता.) – सनातन हिंदु धर्म हा हिंदु राष्ट्राचा प्राण आहे. अनादि काळापासून सनातन हिंदु धर्मातील सिद्धांतानुसारच भारताची राज्यव्यवस्था कार्यरत होती. त्या काळी भारत वैभवाच्या शिखरावर होता; मात्र भारताचे हे वैभव हा आज भूतकाळ झाला आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी आणि एकेकाळी विश्वगुरु असलेल्या भारताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर देशात हिंदु राष्ट्राची स्थापना आपल्याला करावीच लागेल, असे आवाहन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी येथे आयोजित जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले. या सभेला ८ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली.
बांदा शहरातील खेमराज हायस्कूलच्या पटांगणात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या प्रारंभी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा अन् गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री. मनोज खाडये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शंखनाद आणि वेदमंत्रपठण करून सभेचा प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांनी त्यांच्या जाज्वल्य विचारांनी उपस्थित हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे स्फुल्लींग चेतवले.
या वेळी सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘देशात सर्वांना समानतेची शिकवण देणारी राज्यघटना हिंदूंना मात्र वेगळी वागणूक देत आहे. विश्वात सर्वत्र बहुसंख्यांकांचा धर्म, रिलिजन किंवा मजहब यांना कायद्याचा महत्त्वपूर्ण स्रोत मानले गेले आहे. कायदे बनवतांना तेथील बहुसंख्यांकांच्या धर्मपरंपरांचा आधार घेतला जातो. भारतात कुणीही उठतो आणि प्राचीन हिंदु प्रथांना थेट सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देतो. हिंदु धर्माला राजकीय संरक्षण नसल्यानेच ही विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक विकास मंत्रालय’ आहे. बहुसंख्यांक हिंदूंच्या विकासासाठी मात्र ‘बहुसंख्यांक विकास मंत्रालय’ नाही ! संविधानाद्वारेच केला जाणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ? जर नसेल, तर हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद केला पाहिजे.’’
हिंदुत्वाच्या कार्यासाठी बळ देणे, हे हिंदु अधिवक्त्यांचे कर्तव्य ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करतांना हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याची योग्य माहिती घेऊन तिचा वापर करणे आवश्यक आहे. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मागे अधिवक्त्याचे बळ असेल, तर कार्य करणे सोपे होते. त्यामुळे हिंदुत्वाच्या कार्यासाठी बळ देणे हे हिंदु अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरांतून सहस्रो रुपयांचे घोटाळे उघड झाले आहेत, तसेच हिंदूंचा पैसा अन्य धर्मियांवर खर्च केला जात आहे.
गोव्यात शंखवाळी येथे श्री विजयादुर्गा देवीचे मूळ स्थान आहे. त्यावर ख्रिस्त्यांच्या माध्यमातून अतिक्रमण झाले आहे. आम्हाला यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. श्रीरामजन्मभूमी अतिक्रमणमुक्त झाली आहे. येणार्या काळात काशी आणि मथुरा ही तीर्थक्षेत्रेही इस्लामी अतिक्रमणमुक्त होतील. भारतात अतिक्रमण झालेली ४० सहस्र मंदिरे मुक्त होईपर्यंत आपल्याला हा लढा द्यावा लागेल !
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे ! – मनोज खाडये
ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत हाल सोसूनही हिंदु धर्म सोडला नाही, त्यांना ‘धर्मवीर’ म्हणू नका , असे अजित पवार म्हणतात. छगन भुजबळ श्री सरस्वतीदेवीवर टीका करतात. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला जातो. या सर्वांना आता लोकशाहीच्या मार्गाने घरी बसवण्याची वेळ आली आहे.
हिंदु धर्मासमोर लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, हलाल जिहाद, वक्फ बोर्ड कायदा, धर्मांतर अशी अनेक संकटे आहेत. गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. कुडाळ तालुक्यात पावशी येथे डोंगरावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू झाला होता. याविषयी प्रबोधन केल्यानंतर जागृत झालेल्या स्थानिक हिंदूने विरोध केल्यानंतर हा प्रकार बंद झाला. अशा प्रकारे धर्मविरोधी कृत्यांच्या विरोधात चालू असलेल्या या लढ्यात सहभागी व्हा !
सभेला उपस्थित मान्यवर !
१. श्री. रमेश नाईक, माजी गोवा राज्यप्रमुख, शिवसेना.
२. श्री. भाई पंडित, अध्यक्ष, गोमंतक मंदिर महासंघ.
३. श्री. सुरज मंत्रावदी, अध्यक्ष, सातेरी नगर असोसिएशन, म्हापसा.
४. श्री. गोविंद गोवेकर, पंच, उक्सय.
५. श्री. कमलाकांत चतुर्वेद, उद्योजक, पर्वरी.
६. श्री. शिवप्रसाद जोशी, धर्माभिमानी, गोवा.
७. श्री. प्रमोद कामत, माजी शिक्षण सभापती, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद.
८. सौ. श्वेता कोरगांवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, सिंधुदुर्ग.
९. श्री. शितल राऊळ, पंचायत समिती सदस्य, सावंतवाडी.
१०. श्री. परशुराम गावडे, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ कमळेश्वर, कोरगांव.
हिंदु राष्ट्र-जागृती सभेला प.पू. दास महाराज यांचे आशीर्वचन
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झटणे, हेच प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य ! – प.पू. दास महाराज, पानवळ, बांदा
जय जय रघुवीर समर्थ ।।
हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यासाठी आपण सगळे या ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’च्या निमित्ताने एकत्रित जमलो आहोत. हिंदु राष्ट्र ही कुठली राजकीय संकल्पना नाही, तर हिंदु राष्ट्राला आध्यात्मिक आणि सनातन वैदिक धर्माचा आधार आहे. हिंदु राष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य ! हिंदु राष्ट्र म्हणजेच प्रभु श्रीरामाने स्थापन केलेले रामराज्य ! हे रामराज्य काही सहजासहजी स्थापन झाले नव्हते. प्रभु श्रीरामाने वानरसेनेला एकत्र करून, हनुमान, सुग्रीव यांच्या सहाय्याने अथांग समुद्र पार केला. लंकेत जाऊन रावणाचा वध केला आणि सीतामातेची मुक्तता केली. आपणही ज्या हिंदु राष्ट्राचा जयघोष करत आहोत, ते हिंदु राष्ट्र आपल्याला सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला शक्तीची उपासना करावी लागेल. आपली भक्ती वाढवावी लागेल. श्री हनुमान ही बुद्धीचीही देवता आहे. आपल्यालाही आपली बुद्धी केवळ पैसे कमावण्यासाठी नाही, तर धर्मकार्य करण्यासाठी, हिंदु धर्मावर आलेले आघात परतवून लावण्यासाठी वेचावी लागेल.
ज्याप्रमाणे मारुतिराया श्रीरामाचे रामराज्य साकार करण्यासाठी झटले, त्याच प्रमाणे आपणही रामराज्यासमान असणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी झटूया. हेच आपले धर्मकर्तव्य आहे. मारुतीस्तोत्रात ‘कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे ।’ असे मारुतिरायाचे वर्णन केले आहे. याचप्रकारे आपणही हिंदु राष्ट्राकरिता ‘कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे हिंदु राष्ट्राकडे ।’ असा दृढसंकल्प या सभेच्या निमित्ताने करूया. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी प्रभु श्रीराम, महाबली हनुमान यांनी आपल्या सगळ्यांना शक्ती, बुद्धी आणि भक्ती यांचे वरदान द्यावे, अशी प्रार्थना करतो.
जय श्रीराम ! बजरंग बली हनुमान की जय !
धर्मरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या धर्मप्रेमींचा सत्कार
धर्मरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणारे माडखोल येथील रहिवासी श्री. सुशांत जनार्दन भागवत, नास्नोडा, गोवा येथील श्री. गोविंद गोवेकर आणि बांदा येथील श्री. आशुतोष भांगले या धर्मप्रेमींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१. श्री. सुशांत जनार्दन भागवत : हे अभियंता असून माडखोल येथील रहिवासी आहे. धर्मजागृतीच्या कार्यात त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग असतो. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारकार्याच्या अंतर्गत गावागावांत बैठका आयोजित करणे, बैठकांमधून विषय मांडणे, परिणामकारक आणि अभ्यासपूर्ण वैयक्तिक संपर्क करणे, सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसार करणे, प्रत्यक्ष सेवेमध्ये रात्री उशिरापर्यंत वेळ देणे अशाप्रकारे सेवेत सहभाग घेतला.
२. श्री. गोविंद गोवेकर : हे नास्नोडा, गोवा येथील रहिवासी आहेत. ते नास्नोडा पंचायतचे पंचसदस्य आहेत. त्यांनी २ वर्षे सरपंचपद भूषवले आहे. ते श्री रवळघाडी मंदिराचे अध्यक्ष होते. त्यांना राष्ट्र आणि धर्म कार्याची पुष्कळ तळमळ आहे. बांदा येथील सभेच्या दृष्टीने त्यांनी अत्यंत तळमळीने सेवा केली. नास्नोडा भागातील हिंदुत्वनिष्ठ, मंदिर समित्यांचे सदस्य तथा धर्मप्रेमी यांना संघटित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या बैठका घेतल्या. वैयक्तिक संपर्क केले आणि सर्वांनी सभेला यावे; म्हणून त्यांना प्रोत्साहित केले. ते मोठ्या संख्येने हिंदू धर्मप्रेमींना घेऊन सभेत सहभागी झाले.
३. श्री. आशुतोष भांगले : हे बांदा येथील आहेत. पूर्वी कापराचे उत्पादन करणार्या एका आस्थापनाने कापराच्या विज्ञापनात प्रभु श्रीरामाचे विडंबन केले होते. ते रोखण्यासाठी भांगले यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले. परिणामस्वरूप एक वर्षाहून अधिक काळ येथील व्यावसायिक, मंदिरांचे अधिकारी आणि धर्माभिमानी यांनी त्या उत्पादनावर बहिष्कार घातला. अखेर त्या आस्थापनाच्या मालकाने क्षमा मागितली.
बालकक्षाद्वारे लहान मुलांकडून भारतीय संस्कृतीविषयी प्रबोधन
सभास्थळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लहान मुलांनी भारतीय संस्कृतीचे महत्व सांगणारा कक्ष उभा केला होता. यामध्ये कु. आदित्य वाघमारे याने नेताजी सुभाषचंद्र बोस, कु. हर्षवर्धिनी सामंत हिने राजमाता जिजाबाई, कु. राधिका पाटील हिने रणरागिणी झाशीची राणी, कु. तेजस्वी साळसकर हिने कित्तूरची राणी चन्नम्मा, कु. स्वरूप चिऊलकर स्वा. सावरकर आणि कु. भक्तराज टोपकर याने बालवीर शिरीषकुमार यांच्या व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. कु. साधना धामणेकर हिने याविषयीची माहिती दिली.
सभेनंतरच्या पुढील कार्याची दिशा ठरविण्यासाठी आढावा बैठकांचे आयोजन
क्षणचित्रे
१. सभेच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अर्जुन खरात यांनी शंखनाद केला.
२. सावंतवाडी वेदपाठशाळेतील वेदमूर्ती आशुतोष बडवे आणि वेदमूर्ती वल्लभ गगनग्रास यांनी वेदमंत्रपठण केले. त्यांचा सत्कार बांदा येथील धर्मप्रेमी श्री. जयवंत देसाई यांनी केला.
३. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. विपुल भोपळे यांनी केले.
४. श्री. मनोज खाडये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
५. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी करून दिली.
६. सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
७. ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. याचा अनेक धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
८. या सभेला पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी उपाख्य माई नाईक आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या सभेला प.पू. दास महाराज यांनी दिलेला संदेश श्री. विपुल भोपळे यांनी वाचून दाखवला.
९. सावंतवाडी वेदपाठशाळेतील वेदमूर्ती आशुतोष बडवे आणि वेदमूर्ती वल्लभ गगनग्रास यांनी वेदमंत्रपठण केले.
१०. सभेच्या शेवटी समितीचे कार्यकर्ते श्री. मयूर तवटे, श्री. प्रमोद परब, श्री. अक्षय परब, कु. पूजा धुरी आणि कु. अदिती तवटे यांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवली.
११.श्री. मनोज खाडये यांचे मार्गदर्शन चालू असतांना सभास्थळाच्या बाहेर काही मुसलमान महिला सभा ऐकत होत्या.
संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार
१. पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान बांदा येथील धर्मप्रेमी श्री. नीलेश नाटेकर यांनी केला.
प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी उपाख्य माई नाईक यांचा सन्मान सनातनच्या सौ. दिक्षा येडवे यांनी केला. सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान मळगाव येथील सौ. दिव्या तळकटकर यांनी केला.
२. श्री. मनोज खाडये यांचा सत्कार इन्सुली, बांदा येथील धर्मप्रेमी श्री. स्वागत नाटेकर यांनी केला. अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांचा सत्कार बांदा येथील धर्मप्रेमी डॉ. नितीन मावळणकर यांनी केला.
‘हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि आम्ही ते मिळवणारच !’
ही सिंहगर्जना करण्यासाठी…
हिंदु जनजागृती समिती आयोजित
हिंदु राष्ट्र-जागृती सभा, बांदा, दि. ८ जानेवारी २०२३
अवश्य पहा आणि इतरांनाही पाठवूया
___________________________________________
सभा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणार्यांचे आभार
१. खेमराज मेमोरियल स्कूलचे प्रशासकीय अधिकारी श्री. मकरंद तोरसकर, संपूर्ण शालेय प्रशासन आणि व्यवस्थापन यांनी हे पटांगण अन् प्रशालेचे वर्ग सभेसाठी उपलब्ध करून दिले होते.
२. मालवण येथील हिंदमाता डेकोरेटर्सचे मालक श्री. अभिमन्यू पांचाळ यांनी व्यासपीठ उभारणी आणि बैठकव्यवस्था यांसाठीचे साहित्य उपलब्ध करून दिले.
३. श्री. सुभाष शिरोडकर यांनी ध्वनीव्यवस्था उपलब्ध करून दिली.
४. डॉ. नितीन मावळणकर हे काजू व्यावसायिक असून सभेच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःचे मनुष्यबळ, तसेच वाहने उपलब्ध करून दिली. अन्य विविध माध्यमांतून सहकार्य केले.
५. धान्य, तसेच खाऊ दिल्याविषयी व्यापारी सर्वश्री दादा पावसकर, गणपत सावंत, जयवंत धुरी (शेर्ले), कमलाकर नेवगी (शेर्ले), मे. कल्पना ट्रेडर्सचे श्री. कीर्ती पटेल, तसेच बांदा येथील व्यापारी बांधव यांचे आभार मानण्यात आले.
६. सर्वश्री सर्वेश गोवेकर, साईराज दत्तप्रसाद पावसकर, स्वागत नाटेकर आणि त्यांचे दत्तनगर- बांदा मित्रमंडळ, अमेय पावसकर, राजदीप पावसकर, गौरेश सत्यवान सावंत, प्रसाद वाळके, महादेव गवस, श्रीकृष्ण काणेकर, आशिष कल्याणकर, विनित पांगम, सौ. मंगल मयेकर आदींनी समितीच्या कार्यकर्त्यांचे भोजन आणि अल्पोपहार यांची व्यवस्था केली. श्री. विवेक विरनोडकर यांनी ‘स्टेशनरी’ साहित्य उपलब्ध करून दिले.