हिंदु जनजागृती समितीची बांदा येथे पत्रकार परिषद
बांदा (सावंतवाडी) – भारतात हिंदूंवर होणार्या विविध अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता बांदा येथील खेमराज हायस्कूलच्या पटांगणात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
४ जानेवारीला बांदा येथील नट्ट वाचनालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी इन्सुली ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. स्वागत नाटेकर, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, गोवा येथील धर्मप्रेमी अरुण नाईक, येथील काजू उद्योजक डॉ. नितीन मावळणकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवराम देसाई आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
श्री. मणेरीकर पुढे म्हणाले, ‘‘ आज देश आणि धर्म यांवर अनेक संकटे आली आहेत. याविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे करत आहे. भारत हे हिंदु राष्ट्र रहाण्यासाठी हिंदूंमध्ये धर्मजागृतीचे कार्य करणार्या या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.’’ या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये हे मार्गदर्शन करणार आहेत.