कर्नाटकातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्‍वर स्वामी यांचा देहत्याग

पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्री सिद्धेश्‍वर स्वामी

विजयपूर (कर्नाटक) – कर्नाटकातील प्रसिद्ध जननयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्‍वर स्वामी यांनी २ जानेवारी या दिवशी देहत्याग केला. ते ८१ वर्षांचे होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. स्वामी ‘वॉकिंग गॉड’ (चालताफिरता देव) म्हणून त्यांच्या भक्तांमध्ये प्रसिद्ध होते. कर्नाटक सरकारच्या अधिसूचनेनुसार श्री सिद्धेश्‍वर स्वामी यांच्या पार्थिवावर ३ जानेवारी या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री सिद्धेश्‍वर स्वामी यांनी ५ वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माहिती दिली होती.

श्री सिद्धेश्‍वर स्वामी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील इतर नेते यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटले, ‘परमपूज्य श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी त्यांच्या समाजासाठी केलेल्या अतुलनीय सेवेसाठी स्मरणात रहातील. त्यांनी इतरांच्या भल्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्या विद्वत्तापूर्ण उत्साहासाठीही त्यांचा आदर केला गेला. या दुःखद प्रसंगी त्यांच्या भक्तांप्रती सद्भावना व्यक्त करतो.’

श्री सिद्धेश्‍वर स्वामी आणि सनातन !

श्री सिद्धेश्‍वर स्वामींना पंचांग दाखवताना सनातनचे साधक

वर्ष २०१६ मध्ये विजयपूरच्या एका कार्यक्रमात सनातनच्या साधकांनी श्री सिद्धेश्‍वर स्वामीजींची भेट घेऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यांच्या शुभ हस्ते वर्ष २०१६ च्या ‘सनातन पंचांगा’चे लोकार्पण करण्यात आले.

श्री सिद्धेश्‍वर स्वामी सनातनचे पंचांग पाहताना

स्वामींनी व्यासपिठावरच सनातनचे पंचांग हातात धरून ‘सनातन पंचांग प्रत्येकाच्या घरी असले पाहिजे’, असे आवाहन केले. त्यामुळे येथे वितरणासाठी आणण्यात आलेले सर्व २०० पंचांगांचे १ घंट्याच्या आत वितरण झाले आणि पुन्हा २ सहस्र पंचांग आणावे लागले. ‘सनातनचे कार्य अत्यंत चांगले चालले आहे. सनातनचे संस्थापक डॉ. आठवले अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वांना जोडत आहेत. सनातन उत्तम कार्य करत आहे’, असे त्यांनी सांगितले