भारत जगातील तिसरी मोठी विमान वाहतूक बाजारपेठ ! – पंतप्रधान मोदी

पणजी – स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत देशात केवळ ७० विमानतळे होती आणि गेल्या ८ वर्षांत केंद्रात भाजपच्या कारकिर्दीत देशभरात सुमारे ७२ नवीन विमानतळे सिद्ध झालेली आहेत. यामुळे आता विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेला आहे. मध्यमवर्गियांचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण होत आहे. भारत जगातील तिसरी मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोपा, पेडणे येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर बोलतांना केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘विमान प्रवासाचा विस्तार वाढलेला आहे आणि सर्वांना तो सोयीचा झाला आहे. जेव्हा भारत समृद्ध होता, तेव्हा जगात भारताविषयी आकर्षण होते. जगभरातून येथे प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी आदी येत असत; मात्र मधल्या काळात गुलामीचा मोठा कालखंड येऊन गेला. भारताची संस्कृती तीच होती; परंतु भारताकडे पहाण्याचा दृष्टीकोन आता पालटला आहे. २१ व्या शतकातील भारत हा नवीन भारत आहे. वैश्विक स्तरावर भारताची नवीन प्रतिमा सिद्ध होत आहे आणि यामुळे भारताकडे पहाण्याचा जगाचा दृष्टीकोन पालटला आहे.मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण केल्याने मला पुष्कळ आनंद होत आहे. माझे प्रिय सहकारी आणि गोव्याचे लाडके माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देणे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.’’

गोव्यात दोन्ही विमानतळे चालू रहाणार ! – ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय विमानोड्डाण मंत्री

याप्रसंगी केंद्रीय विमानोड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, ‘‘गोवा हे देशातील पहिले राज्य आहे, जेथे २ विमानतळे (मोपा, पेडणे येथील ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दाबोळी येथील नौदलाचे विमानतळ) कार्यान्वित असतील. गोवा राज्याला उडान योजनेच्या अंतर्गत मैसुरूला जोडण्यात आले आहे आणि पुढील काळात गोव्याला नाशिकशी जोडण्यात येणार आहे.