बीड येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन
बीड, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु स्त्रियांनी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र ओळखून वेळीच जागृत होणे आवश्यक आहे. इतिहासातून प्रेरणा घेऊन हिंदु स्त्रियांनी धर्माभिमान जोपासायला हवा. हिंदु युवतींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी न पडता ‘लव्ह जिहाद’ घडवणार्या धर्मांधांना धडा शिकवला पाहिजे, असे ठाम मत करणी सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा अधिवक्त्या संध्या राजपूत यांनी मांडले. हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
१. या वेळी ‘विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी’च्या अध्यक्षा सौ. रत्ना बहिरवाल, कीर्तनकार ह.भ.प. श्रीमती प्रज्ञाताई रामदासी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख, श्री. विक्रम घोडके, श्री. विनोद रसाळ, रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे, सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे, श्रीमती वीणा साखरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
२. या वेळी सौ. रत्ना बहिरवाल म्हणाल्या, ‘‘हिंदु स्त्रियांनी सशक्त होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंनी संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’चा सामना करायला हवा.’’ ह.भ.प. श्रीमती प्रज्ञाताई रामदासी म्हणाल्या, ‘‘प्रेम ही एक पवित्र भावना आहे, नाजूक आणि हळूवार नाते आहे, भोगवादी प्रेमाचा हिंदूंनी त्याग करायला हवा. ‘लव्ह जिहाद बंदी’ कायदा यायलाच हवा, त्यासमवेत हिंदु स्त्रियांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणाची कास धरली पाहिजे.’’
क्षणचित्र – आंदोलनाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.