उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या फोंडा (गोवा) येथील साधिका श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती भारती पालन यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना पू. रेखा काणकोणकर (डावीकडे)

रामनाथी (गोवा) – व्यावहारिक जीवनातील संघर्षाच्या अनेक प्रसंगांना गुरुदेवांवरील श्रद्धेच्या बळावर तोंड देणार्‍या आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या पाटणतळी, फोंडा येथील साधिका श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका सत्संगात घोषित केली. या आनंदाच्या प्रसंगी सनातनच्या संत पू. रेखा काणकोणकर यांनी श्रीमती पालन यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी त्यांचा मुलगा श्री. विनोद, मुलगी कु. योगिता पालन यांच्यासह आश्रमातील धान्य भांडारात सेवा करणारे साधक उपस्थित होते. कुटुंबीय, तसेच सहसाधक यांनी श्रीमती पालन यांची गुणवैशिष्ट्ये कथन केली.

ईश्वराप्रती उत्कट भाव आणि सेवेशी एकरूपता या वैशिष्ट्यांमुळे श्रीमती पालन यांची जलद आध्यात्मिक उन्नती ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

आपल्या अंतरात भाव असेल, तर त्याची स्पंदने कार्यरत होऊन इतरांचाही भाव जागृत होतो. श्रीमती पालनकाकू अंतर्मुख आणि देवाच्या अनुसंधानात असतात. त्यामुळे त्यांना पाहून इतरांचा भाव जागृत होतो. सायंकाळी सेवा झाल्यावर घरी जाण्यासाठी मुलीची वाट पहात त्या आश्रमातील स्वागतकक्षात बसलेल्या असतात. तेव्हाही ‘त्या कुणाची वाट पहात आहेत’, असे वाटत नाही, तर ‘त्या ईश्वराच्या अनुसंधानात आहेत’, असे वाटते. पालनकाकू बोलायला लागल्यावर वातावरणातील दाब अल्प झाला. त्यांचे बोलणे ऐकतच रहावे वाटते. त्यांना घरात सुगंधाची अनुभूती येते. सुगंधाच्या माध्यमातून ईश्वर त्याचे अस्तित्व दाखवत असतो.

जीवनातील कठीण प्रसंग आपल्याला नको वाटतात; परंतु काकूंनी अशा प्रसंगांतूनही साधना केली. त्यांचे यजमान शंकर पालन हे दीर्घकाळ आजारी होते. त्यांचे आजारपण वाढत गेले, तरी काकू स्थिर राहून त्याला सामोर्‍या गेल्या. ईश्वराप्रती उत्कट भाव, सेवेशी एकरूपता ही काकूंची वैशिष्ट्ये आहेत. त्या गुणांमुळे त्यांची साधनेत लवकर प्रगती झाली.

 

आईने सर्वकाही गुरुदेवांच्या चरणी सोपवले आहे ! – कु. योगिता पालन (श्रीमती भारती पालन यांची मुलगी)

कु. योगिता पालन

आईचा नामजप अखंड चालू असतो. ती आश्रमात सेवेला येण्यापूर्वी तिच्या व्यष्टी साधनेसाठीचा नामजप पूर्ण करते. विभागात किंवा कुटुंबियांमध्ये काही प्रसंग घडले, तरी ती त्यात अडकून रहात नाही. तिच्याकडून झालेली चूक ती घरी येऊन सांगते. तिला त्या चुकीची खंत वाटत असते. ती त्याविषयी बोलून घेऊन प्रसंगातून बाहेर पडते. आईला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे सारणीलिखाण अचूकतेने जमत नाही. स्वयंसूचना बनवण्यासाठी साहाय्य लागते. तरीही तिला जे जमत नाही, ते विचारून घेऊन साधनेचे सर्व प्रयत्न पूर्ण करते. तिच्या समवेत सेवा करणारे अन्य साधक दिवसभरातील साधनेचा आढावा कळण्यासाठी दैनंदिनी लिहितात. आईला मराठी लिहिता येत नसल्याने ती घरी येऊन माझे साहाय्य घेऊन दैनंदिनी लिखाण पूर्ण करते. तिची अडचण लक्षात घेऊन उत्तरदायी साधकांनी तिला दैनंदिनी लिखाणासाठी अन्यही पर्याय सुचवले होते; मात्र ‘दैनंदिनी लिहिली पाहिजे’, या तळमळीने ती माझे साहाय्य घेऊन साधनेचा तो प्रयत्नही गांभीर्याने पूर्ण करते. ती सत्संगात श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी सांगितलेले साधनेचे प्रयत्न करते. आईने सर्वकाही गुरुदेवांच्या चरणी सोपवले आहे. प्रसंग घडल्यास ‘गुरुदेव पहातील’, अशी तिची श्रद्धा असते.

१. श्रीमती भारती पालन यांचे मनोगत आता सेवा आणि साधना सोडून कुठेच जायचे नाही ! 

श्रीमती भारती पालन

मला आज पुष्कळ आनंद झाला आहे. गुरूंच्या चरणी कृतज्ञता वाटते. ‘मला यानंतर पुन्हा अहं होऊ नये’, अशी प्रार्थना करते. आता मला गुरूंच्या चरणीच रहायचे आहे. यजमानांच्या निधनानंतर आश्रमात येऊ लागल्यानंतर सेवेची ओढ वाढली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धान्य भांडारातील साधकांच्या साधनेला दिशा देण्यासाठी घेतलेल्या सत्संगानंतर साधनेची ओढ आणखी वाढली. त्या सत्संगानंतर सेवा करतांना विविध अनुभूती येऊ लागल्या. घरी गेल्यावर उदबत्ती न लावताही सुगंध येत असे. आश्रमात दिवसभर सेवा करून घरी गेल्यानंतरही मला थकवा जाणवत नाही किंवा शारीरिक त्रास होत नाहीत. आता मला सेवेतून इतका आनंद मिळतो की, सेवा सोडून घरी थांबावे वाटत नाही. ‘मी प्रत्यक्ष गुरुदेवांचीच सेवा करत आहे’, असा भाव ठेवते. सगळे साधक मला आपले वाटतात. ‘आता सेवा आणि साधना सोडून कुठेच जायचे नाही’, असे मला वाटते.

२. साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

२ अ. ‘आईमध्ये पालट झाला आहे’, हे जाणवते ! – श्री. विनोद पालन (श्रीमती भारती पालन यांचा मुलगा)

गेल्या काही मासांपासून आईमध्ये पुष्कळ पालट जाणवतो. आधी ‘ती कोणत्यातरी विचारात आहे’, असे जाणवत असे. अलीकडे ‘ती वेगळ्या स्थितीत आहे’, हे जाणवते. तिला सेवेची पुष्कळ ओढ वाटते. या वेळी मी बर्‍याच मासांनी घरी आल्यानंतरही ती १ दिवस घरी थांबली आणि दुसर्‍या दिवशीपासून आश्रमात सेवेसाठी गेली. तिची या वयातही कष्ट करण्याची सिद्धता आहे. कठीण प्रसंगही पुष्कळ आले; पण त्यातही आई स्थिर राहिली. आम्ही पूर्वी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे रहात होतो. आता पाटणतळी, फोंडा येथे आल्यानंतरही डोंबिवली येथील काही शेजारी आईला भेटण्यासाठी गोवा येथे आले होते. एवढी तिने शेजारच्यांशी जवळीक केली होती ! प्रेमभाव तिच्या वृत्तीतच आहे.

२ आ. अनेक प्रसंगांतून श्रीमती पालन यांचा प्रेमभाव अनुभवता आला ! – श्री. श्रीकांत आणि सौ. माया पिसोळकर

श्रीमती पालन आमच्या शेजारी रहातात. त्या असल्यामुळे आम्हाला पुष्कळ आधार वाटतो. अनेक प्रसंगांत आम्हाला त्यांचा प्रेमभाव अनुभवता येतो. त्यांच्या प्रेमभावामुळे आम्ही २ कुटुंबे असूनही एका कुटुंबाप्रमाणे जवळीक वाटते.

२ इ. श्रीमती पालन साधनेच्या प्रयत्नांची दिशा विचारून घेतात ! – सौ. मनीषा गायकवाड

साधनेच्या प्रयत्नांविषयी विशेष माहिती नसल्यामुळे श्रीमती पालन पूर्वी व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगांना बसत नसत. नंतर त्यांना स्वतःहूनच ‘आढावा सत्संगांना बसायला हवे’, असे वाटले आणि त्या नियमित व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगामध्ये उपस्थित राहू लागल्या. त्या ‘प्रयत्न कसे करावेत’, याची दिशा घेतात.

२ ई. सेवा आणि अनुसंधानातही एकरूप होणार्‍या श्रीमती पालन ! – कु. गुलाबी धुरी

श्रीमती पालनकाकू धान्य निवडण्याची सेवा करतांना पुष्कळ मन लावून आणि एकाग्रतेने सेवा करतात. सेवा करतांना त्यांना पाहिले की, ‘काकू सेवेशी एकरूप झाल्या आहेत’, असे वाटते. ‘धान्यामध्ये त्या भगवंतालाच पहात आहेत’, असे जाणवते. त्यांच्या बोलण्यात पुष्कळ प्रेम आहे. त्या आश्रमात आल्यावर प्रथम ध्यानमंदिरात जाऊन देवतांना नमस्कार करतात आणि मग पुढील सेवेला प्रारंभ करतात. रात्री घरी जातांनाही स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या प्रतिमेसमोर बसून आत्मनिवेदन करतात. जसे त्या सेवेशी एकरूप होतात, तसेच त्या अनुसंधान साधतांना प.पू. बाबांशी एकरूप झालेल्या असतात. त्या अनुभूती सांगतांनाही चंदनाचा सुगंध येत होता.

३. श्रीमती भारती पालन यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याच्या संदर्भातील पूर्वसूचना

अ. श्रीमती भारती पालन यांना पाहूनच अनेक साधकांना ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली आहे’, असे वाटत असे. अनेक साधिकांनी कु. योगिता पालन यांना तसे सांगितलेही होते.

आ. सत्संगाला उपस्थित असलेल्या डॉ. सुजाता जाधव या वेळी म्हणाल्या, ‘‘मी श्रीमती पालनकाकूंना प्रथम पाहिले, तेव्हा काकू भावस्थितीत होत्या. तेव्हा त्यांना पाहून माझीही भावजागृती झाली. त्या वेळी ‘त्यांची आध्यात्मिक पातळी किती आहे ?’, अशी मला जिज्ञासा वाटली होती. आज या सोहळ्याद्वारे ‘तो विचार ही पूर्वसूचना होती’, हे लक्षात आले.’’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक