महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, याचे दायित्व आमचे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील काही प्रश्न, समस्या सोडवण्यात आल्या असून काही समस्या अद्यापही आहेत. उरलेले प्रश्नही युद्धपातळीवर सोडवले जातील. महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, याचे दायित्व आमचे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे म्हटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

(सौजन्य एबीपी माझा )

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘या भागातील ८६५ गावांमधील मराठी माणसांचा हा प्रश्न आहे. सुविधा देणे, अनुदान देणे, विविध लाभ देणे यांवर आम्ही निर्णय घेत आहोत. सर्वोच्च न्यायालयात याविषयी लढाई चालू आहे; परंतु हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याची आवश्यकता आहे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.

मधल्या काळात राज्यपालांची बैठकही झाली. त्या बैठकीत अनेक सूचना आल्या आहेत. याविषयी दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्याही बैठका झाल्या आहेत. यात केंद्र सरकारही सकारात्मक भूमिका घेईल.”