१५ वर्षांनंतर प्रथमच चिकन आणि मासे यांच्या नमुन्यांची पडताळणी करणार !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांचा आदेश !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – अन्न आणि औषध प्रशासनाकडून १५ वर्षांनंतर प्रथमच राज्यातील विक्रेत्यांकडील चिकन अन् मासे यांची पडताळणी करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याविषयी आदेश काढले.

याआधी केवळ स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून त्यांची पडताळणी केली जात असे; पण आता त्यांचे नमुनेही पडताळण्यात येणार आहेत. खरेतर कायद्यात तशी तरतूद असतांनाही आतापर्यंत तसे झाले नाही. (गेली १५ वर्षे या संदर्भातील कायद्याची कार्यवाही न करणार्‍या अधिकार्‍यांवरच कारवाई करणे अपेक्षित आहे. – संपादक) प्रशासनाच्या प्रयोगशाळेत अशी पडताळणी न झाल्याने, तसेच सुविधांचा अभाव असल्यामुळे खासगी प्रयोगशाळेत हे नमुने पडताळणीसाठी पाठवले जाणार आहेत. (प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील असुविधा तातडीने दूर करायला हव्यात ! – संपादक)