मुंबईत अवैधपणे रहाणारे ४५० विदेशी नागरिक हद्दपार !

आफ्रिका खंडातील ४०० हून अधिक नागरिकांचा समावेश

मुंबई – विदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाने शहरात अवैधपणे रहाणार्‍या ४५० विदेशी नागरिकांना देशातून हद्दपार केले. यामध्ये ४०० पेक्षा अधिक नागरिक आफ्रिका खंडातील होते. भारतातच रहाता यावे, यासाठी काही विदेशी नागरिक गुन्हेही करत होते. या गुन्ह्यांच्या खटल्यांचा निकाल लागेपर्यंत त्यांना मायदेशी जाता येत नाही. त्यामुळे याचा ते अपलाभ घेतात. (असे होणे, म्हणजे भारत हे गुन्हेगारांचे आगरच झाल्यासारखे आहे ! – संपादक) गेल्या वर्षी देशात नायजेरिया आणि आफ्रिका येथील ७९८ नागरिकांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. (केवळ गुन्हे नोंदवून काय उपयोग ? त्यांच्यावर कारवाई काय झाली ? – संपादक)

१. विदेशी नागरिक भारतात आल्यावर त्याने रहात असलेल्या ठिकाणची माहिती देणे बंधनकारक आहे; मात्र भारतात अवैधपणे रहाता यावे, यासाठी अनेक जण अर्ज भरून नोंदणीच करत नाहीत.

२. आफ्रिका खंडातील सहस्रो नागरिक मुंबईत रहातात. यामध्ये शिक्षण आणि व्यवसाय यांसाठी आलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. यांतील काही जण अवैधपणे रहात आहेत.

३. मुंबई आणि परिसरात एकही स्थानबद्ध केंद्र नसल्यामुळे शहरात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर नियमित कारवाई होत नाही. (इतक्या वर्षांत स्थानबद्ध केंद्राची स्थापना का केली नाही ? – संपादक)

४. नियमभंग करून देशात रहाणार्‍या विदेशी नागरिकांना शोधण्यासाठी ‘एफ्.आर्.आर्.ओ.’ विभाग भारतीय गुप्तहेर यंत्रणेच्या (आय.बी.) साहाय्याने विशेष मोहीम राबवतो. अशा नागरिकांना पकडल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्यासाठी प्रक्रिया चालू करण्यात येते. संबंधित व्यक्तीला परदेशात पाठवल्यानंतर अशा व्यक्तीचा काळ्या सूचीत समावेश करण्यात येतो. त्यामुळे तिला पुन्हा भारतात प्रवास करणे कठीण होते, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.

संपादकीय भूमिका

इतक्या मोठ्या संख्येने विदेशी नागरिक अवैधपणे रहातात, हे पोलिसांना वेळीच का लक्षात आले नाही ? कि येऊनही त्यांनी दुर्लक्ष केले ?, याचीही चौकशी झाली पाहिजे ! विदेशींना अवैधपणे भारतात राहू देणार्‍यांवरही कठोर कारवाई व्हायला हवी !