वरिष्ठ अधिवक्त्यांनी त्यांच्या हाताखालील कनिष्ठ अधिवक्त्यांना योग्य वेतन दिले पाहिजे ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

नवी देहली – एखादा कनिष्ठ अधिवक्ता देहली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांत रहात असेल, तर त्याला चरितार्थासाठी बरेच पैसे लागतात. अशा शहरांत खोली भाडे, प्रवास, जेवण असा सर्व खर्च असतो. असे किती वरिष्ठ अधिवक्ता आहेत, जे आपल्यासमवेत काम करणार्‍या कनिष्ठ अधिवक्त्यांना योग्य वेतन देतात ? लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार्‍या कनिष्ठ अधिवक्यांना योग्य वेतन दिले पाहिजे. ते वरिष्ठ अधिवक्त्यांचे गुलाम नाहीत. वकिली करणे, हे या क्षेत्रातील केवळ वरिष्ठांचेच काम नाही, असे परखड प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी येथे बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात केले.

वकिली क्षेत्र वरिष्ठ लोकांचा ‘क्लब’ !

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड पुढे म्हणाले की, वकिली क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असमानता आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका अधिवक्त्याकडे ७-८ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्क्रीन असतात. माऊसच्या एका क्लिकवर एका न्यायालयातून दुसर्‍या न्यायालयात जाण्याची त्यांच्याकडे सोय असते. (विविध न्यायायलयांतील सुनावण्यांच्या वेळी ऑनलाईन उपस्थित रहाण्याची सुविधा असते.) दुसरीकडे असे काही अधिवक्ते आहेत, जे कोरोना काळात संकटात सापडले होते. वकिली क्षेत्र वरिष्ठ लोकांचा क्लब आहे. येथे केवळ एकाच समूहातील लोकांना संधी मिळते. हे चित्र पालटायला हवे.