सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘एकदा मी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेले होते. एके दिवशी सकाळपासूनच ‘आज मला प.पू. डॉक्टरांच्या भावसत्संगाचा लाभ होणार आहे’, असे वाटत होते. त्यामुळे माझी भावजागृती होत होती. माझ्याकडून आपोआप ‘या गुरुराया मम मंदिरा……’, या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनाच्या ओळी सतत गुणगुणल्या जात होत्या.
दुपारी मी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. नामजप करत असतांना ‘ध्यानमंदिरातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रामध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘प.पू. डॉक्टर माझ्याकडे बघून स्मित करून ‘आज मी तुला दर्शन देणार आहे’, असे सांगत असल्याचे मला जाणवले. त्यानंतर मी डोळे बंद करून नामजप करू लागले. त्या वेळी माझा आपोआप ‘प.पू. गुरुदेव’, असा नामजप होऊ लागला. नामजप करतांना मला प.पू. डॉक्टर श्री नारायणाच्या विराट रूपात दिसले. त्यांच्या बाजूला श्रीमहालक्ष्मीच्या रूपात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दिसल्या. थोड्या वेळानंतर मला ‘आज गुरुदेवांचा सत्संग लाभणार आहे’, असा निरोप मिळाला. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला आणि माझे मन निर्विचार झाले.
ही अनुभूती दिल्याबद्दल मी प.पू. डॉक्टर आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. भाग्यश्री भगवान वाघमारे, संभाजीनगर
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |