सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारी सातारा येथील कु. सर्वस्वी श्रीकांत सवळे (वय ६ वर्षे) हिची ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

कु. सर्वस्वी सवळे हिचा भेटवस्तू देऊन सत्कार करताना श्री. उदय ओझर्डे

फलटण (जिल्हा सातारा), २० नोव्हेंबर (वार्ता.) – प्रेमळ, समजूतदार आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असणारी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. सर्वस्वी श्रीकांत सवळे हिची ६० टक्के आध्यात्मिक पातळी असल्याची आनंदवार्ता १२ नोव्हेंबर या दिवशी पू. (कु.) दीपाली मतकर यांनी ‘ऑनलाईन’ सत्संगात दिली. या आनंददायी  सोहळ्याच्या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. उदय ओझर्डे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), बारामती येथील सौ. रूपाली चव्हाण यांच्यासह कु. सर्वस्वी हिचे कुटुंबीय उपस्थित होते, तर रामनाथी आश्रमातील साधिका कु. वर्षा जबडे (सर्वस्वीची मावशी) या ‘ऑनलाईन’ सहभागी झाल्या होत्या. या वेळी श्री. उदय ओझर्डे यांनी कु. सर्वस्वीचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. ही आनंदवार्ता मिळताच सौ. दर्शना सवळे (कु. सर्वस्वीची आई) यांना पुष्कळ आनंद होऊन त्यांचा भाव जागृत झाला. या वेळी कु. सर्वस्वीची आजी श्रीमती पुष्पा सवळे याही उपस्थित होत्या.

कु. सर्वस्वी श्रीकांत सवळे हिची गुणवैशिष्ट्ये

कु. सर्वस्वी सवळे

१. धर्माचरणाची आवड

‘पूर्वी कु. सर्वस्वीला पाश्चात्त्य पद्धतीचे पोशाख घालण्यास आवडायचे; परंतु आता ती स्वतःहून सात्विक पोषाख घालायला मागते.

कु. वर्षा जबडे

२. अभ्यासाची आवड

सर्वस्वी शाळेत सांगितलेला अभ्यास त्या त्या दिवशी स्वतःहून आणि कंटाळा न करता पूर्ण करते. अभ्यास करत असतांना तिला मध्येच कुणाचे फोन आले, तर ती त्यांना ‘नंतर बोलते’, असे सांगते.

३. प्रेमभाव

अ. ज्या मुलांकडे खेळणी नसतील, त्यांना कु. सर्वस्वी स्वतःची खेळणी देऊन स्वत:समवेत खेळामध्ये सहभागी करून घेते.

आ. सर्वस्वीच्या आत्याची मुलगी तिच्यापेक्षा मोठी आहे. आत्याच्या मुलीसमवेत सर्वस्वीचे काही बिनसले, तर ती थोडा वेळ तिच्याशी बोलत नाही; पण नंतर लगेच ती स्वतःहून तिच्याशी बोलू लागते.

इ. घरी पाहुणे आल्यावर सर्वस्वी स्वतःहून त्यांना पाणी देते अणि त्यांच्या घरच्यांविषयी, तसेच त्यांच्या मुलांविषयी प्रेमाने विचारपूस करते. तिला सर्वांशी बोलायला आवडत असल्याने तिची समोरच्या व्यक्तीशी लगेच जवळीक होते.

ई. सर्वस्वीची आई दुसर्‍या मुलाच्या वेळी गरोदर असतांना सर्वस्वी आईला सांगायची, ‘‘आई, तू वाकू नकोस. तुला काही हवे असेल, तर मला सांग. मी देते.’’ त्या कालावधीत ‘आईला काही त्रास होत आहे’, हे सर्वस्वीच्या लक्षात आल्यास ती आईला घरकामात साहाय्य करायची.

उ. सर्वस्वीच्या लहान भावाचा जन्म झाल्यापासून ती त्याची पुष्कळ काळजी घेते. त्याच्या औषधांची वेळ झाल्यावर सर्वस्वी आईला त्याला औषध देण्यासाठी आठवण करून देते.

ऊ. सर्वस्वी घरी सर्वांना जेवायला वाढणे, जेवण झाल्यावर पटल आवरणे अशी कामे स्वतःहून करते. मामाच्या घरी गेल्यावरही ती मामीला कामांत साहाय्य करते.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

‘मी साधना करण्यासाठी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात रहाते’, हे सर्वस्वीला तिच्या आईकडून कळल्यापासून तिच्या मनात परात्पर गुरुदेवांना पहाण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची पुष्कळ जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा तिच्याशी भ्रमणभाषवर बोलते, तेव्हा तेव्हा ती माझ्याकडे परात्पर गुरुदेवांविषयी विचारणा करत असते. यातून तिच्या मनात परात्पर गुरुदेवांविषयी असलेला भाव लक्षात येतो.

५. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

माझी आई (कु. सर्वस्वीची आजी) रुग्णाईत असतांना संतांनी आईसाठी सांगितलेले नामजपादी उपाय मी सौ. दर्शनाला (कु. सर्वस्वीच्या आईला) करायला सांगितले होते. त्या वेळी सर्वस्वीने निर्गुण स्तरावरील ते नामजप पहिल्यांदाच ऐकले होते. ते ऐकल्यावर सर्वस्वी स्वतःहून तिच्या आईला म्हणाली, ‘‘हे नामजप करायला तुला वर्षामावशीने सांगितले ना ?’’ तेव्हा तिच्यातील सनातन आश्रम आणि संत यांचे वेगळेपण जाणण्याची प्रगल्भता अन् सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता माझ्या लक्षात आली.

६. स्वभावदोष

हट्टीपणा आणि भ्रमणभाषचा अनावश्यक वापर करणे.’

– कु. वर्षा जबडे (कु. सर्वस्वीची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.