‘प्रत्येक मानवाला त्रिनेत्र आहेत’, असे आपली (हिंदु) संस्कृती मानते. ज्यांचे हे तिन्ही नेत्र उन्मीलित (जागृत) होतात, त्यांना आपण देव किंवा ईश्वर मानतो. सामान्यातील सामान्य मानवसुद्धा तिन्ही नेत्र उन्मीलित करून ईश्वरस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. दोन नेत्र सर्वज्ञात आहेत. आपल्या संस्कृतीत त्यांना ‘चंद्र आणि सूर्य नेत्र’, असे मानले आहे, तर तृतीय नेत्र, म्हणजे ‘ज्ञानचक्षु’ हा अग्नीस्वरूप आहे. हा नेत्र कपाळाच्या मधोमध असतो. या नेत्राचा आपल्या देहातील अत्यंत महत्त्वाच्या अशा नाड्यांशीसुद्धा थेट संबंध आहे. आपण ज्या वेळी ‘अनुलोम विलोम’ म्हणजेच नाडीशोधन प्राणायाम करतो, त्या वेळी अंगठा आणि अनामिका आपण एकेका नाकपुडीवर आलटून पालटून दाब देत असतो अन् मधली दोन बोटे बरोबर तृतीय नेत्र असलेल्या कपाळाच्या मधोमधच्या स्थानी दाबलेली असतात. सूर्य आणि चंद्र नाडीचे पूर्ण संतुलन झाल्यावर सुषुम्ना नाडीचे उद्दीपन (जागृत) सुलभ होण्यासाठी हे साहाय्यभूत ठरते. त्याच बिंदूवर आपण पुरुष असो वा स्त्री तिलक किंवा कुंकू लावतो. त्यामागे ‘सुषुम्ना नाडीचे उद्दीपन सुलभ व्हावे’, हेच कारण आहे. |
१. सुषुम्ना नाडीचे उद्दीपन महत्त्वाचे का ?
सुषुम्ना नाडी ही जीवाच्या आत्मउन्नतीला साहाय्यभूत ठरते. सुषुम्ना नाडी व्यक्तीला कार्यप्रवण आणि ओजस्वी बनवते, तसेच मन अन् बुद्धी यांचे संतुलन साधते, म्हणजेच मन शांत आणि स्थिर करते. चंचलता न्यून करते. हे उद्दीपन साधावे आणि दिवसभर याचा प्रभाव रहावा, यासाठी सोपा उपाय म्हणजे पुरुषांनी तिलक, तर स्त्रियांनी कंकू लावावे’, असे आपल्या संस्कृतीने सांगितले आहे.
२. कुंकूच का ? आणि रक्तवर्णीच का ?
कुंकू हे हळदीपासून बनवलेले असते, हे कपाळावर लावल्याने चंचलता न्यून होते. आत्मोन्नती साधते आणि ते अग्नीचे प्रतीक म्हणून रक्तवर्णी वापरतात. सवाष्ण रक्तवर्णी कुंकू का लावते ? कारण ती प्रपंचात आहे. प्रापंचिक सुख उपभोगत असून त्याचे प्रतीक म्हणून रक्तवर्णी कुंकू.
३. मग विधवा स्त्रियांचे काय ?
ज्यांना धर्म अल्पसा जरी माहिती असेल, तर त्याला हे ज्ञात असेल की, विधवा स्त्रिया जर शैव असतील, तर मस्तकी रुद्राभिषेक करतात त्याचा अंगारा किंवा भस्म धारण करतात. वैष्णव असतील, तर ते गोपीचंदन लावतात; पण कपाळ कुणीही पांढरे कधीच ठेवत नाहीत. या सिद्धांताचे वास्तवात सर्व हिंदु स्त्री-पुरुषांनी पालन केलेच पाहिजे. आपण करत नाही, ही आपली चूक आहे.
४. सवाष्ण बायकांना कुंकू आणि विधवा स्त्रियांना गोपीचंदन किंवा अंगारा किंवा भस्म का ?
रक्तवर्ण हा प्रपंचातील आसक्तीचे प्रतीक आहे; म्हणून प्रापंचिक व्यक्तींनी रक्तवर्णी म्हणून कुंकू वापरणे अभिप्रेत असते. गोपीचंदन किंवा भस्म हे सामान्यतः वैराग्य अवस्थेशी निगडीत असून ‘विधवा असल्यास रक्तवर्णीय कुंकू धारण केले, तर प्रपंचाची आसक्ती अजून संपली नाही’, असा याचा अर्थ आहे.
५. पू. भिडेगुरुजींच्या वक्तव्याचा अर्थ
भारतमाता विधवा असेल, तर ती गोपीचंदन किंवा भस्म धारण करील; पण ती १४० कोटी लोकांची आई आहे. मग आईला वैराग्य आले, तर ती प्रपंचाची काळजी करील का ? नाही. म्हणून तिला रक्तवर्णीच कुंकू धारण केलेली अशीच दाखवणार. पारतंत्र्य हे एक प्रकारचे वैधव्यच आहे आणि सवाष्ण अशी भारतमाता ही पालन स्वरूपात आहे. त्यामुळे तिने वैराग्यरुपी प्रतीके धारण केली, तर त्यातून अधिक गोंधळ उडेल. यास्तव ती सवाष्ण रूपात पहाणेच श्रेयस्कर आहे. पू. भिडेगुरुजींच्या वक्तव्याचा हा असा अर्थ आहे.
आपले प्रत्येक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक हे गूढ आध्यात्मिक अर्थ धारण केलेले आहे. आपल्या धर्मात काहीही न्यून नाहीच; परंतु कोणत्याही गोष्टीचा अर्थ ज्ञात नसला की, मग असा गदारोळ निर्माण होतो; म्हणून आम्ही वारंवार सांगतो की, तुम्ही धर्म जाणून त्याचे रक्षण करा, धर्म तुमचे रक्षण करील !’ (साभार : फेसबुक)
हिंदु धर्मातील कुंकू लावण्याच्या आचरणामागील शास्त्र जाणून घेण्याचा प्रयत्न कथित पुरो(अधो)गामी करतील का ? |