जळगाव शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलावर पथदिवे बसवण्याचे काम पूर्ण होऊन केबल घालण्याचे काम चालू होते. या वेळी पथदिवे चालू होण्यापूर्वीच चोरट्यांनी ते चोरण्यास आरंभ केला. याविषयीची काही छायाचित्रे एका सामाजिक कार्यकर्त्याने सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली. अशा प्रकारे राष्ट्रीय संपत्तीची चोरी करण्याची झालेली मानसिकता देशासाठी अत्यंत घातक आहे. अशी जनता कधी तरी देशाला महासत्ता बनवेल का ? असा प्रश्न सूज्ञ जनतेच्या मनात आल्यावाचून रहाणार नाही.
काही मासांपूर्वी काही ग्रामीण भागातील लोक शासकीय सौर ऊर्जा प्रकल्प हातोड्याने तोडत असतांनाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले होते. सरकारी मालमत्तेची हानी करणारी ही मानसिकता जन्माला येण्यामागे स्वातंत्र्यानंतर देशावर राज्य करणार्या काँग्रेसच्या निधर्मी राज्यप्रणालीची फळे आहेत; कारण त्यांनी समाजमनावर ‘राष्ट्र-धर्माशी माझे काही देणे घेणे नाही’, असाच संस्कार केला आहे. या स्वार्थी मानसिकतेतूनच असे प्रकार राजरोसपणे भर दिवसा घडत आहेत.
एकीकडे सरकार आमच्यासाठी काही करत नाही, अशी ओरड करायची आणि दुसरीकडे सरकारी मालमत्तांची हानी करायची. सरकारने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशीच सर्वसामान्य करदात्या जनतेची अपेक्षा असते. ‘गरिबी किंवा अशिक्षित समाजामुळे असे प्रकार घडतात’, असे म्हटले, तर ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात जनतेला आतासारखे शिक्षण नसूनही आणि आर्थिक परिस्थिती बेताची असूनही रयतेच्या गवताच्या पात्यालाही हात लावण्याचे कुणाचे धाडस नव्हते; कारण त्यांच्या मनात ‘हिंदवी स्वराज्या’चे संस्कार छत्रपती शिवरायांनी निर्माण केले होते. यामुळेच जनतेला ‘हे माझे राज्य आहे’, अशी भावना असायची आणि तो कुठल्याही मालमत्तेची हानी करत नसे.
‘यथा राजा तथा प्रजा’, या उक्तीप्रमाणे राजा जर धर्माचरणी असेल, तर प्रजाही धर्माचरणी होते; म्हणून प्रत्येक प्रभागाचा लोकप्रतिनिधी हा धर्माचरणी असेल, तर प्रजा आपोआप धर्माचरण करील. अजूनही वेळ गेलेली नाही. जनतेला धर्मशिक्षण दिल्यास तिला आपोआपच ‘कसे वागायला हवे’, किंवा अयोग्य कृतींमुळे ‘स्वतःचीच कशी हानी होते’, हे समजेल. यासाठीच कष्टाने मिळवून न खाता चोरून खाण्याची मानसिकता ठेचायची असेल, तर त्यासाठी कायद्याची प्रभावी आणि चोख कार्यवाही हवी !
– श्री. जयेश बोरसे, पुणे