माले (मालदीव) – येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत १० परदेशी कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीच्या तळमजल्यावर चारचाकी वाहनाच्या दुरुस्तीच्या ‘गॅरेज’मध्ये आग लागली होती. मृतांपैकी ९ भारतीय, तसेच एका बांगलादेशी नागरिक यांचा समावेश आहे. अनेक जण घायाळ झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अनुमाने ४ घंटे लागले. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. आम्ही मालदीव सरकारच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मालदीवमधील परदेशी कामगारांची स्थिती दयनीय !
या घटनेनंतर मालदीवमध्ये वाईट परिस्थितीत रहाणार्या परदेशी कामगारांचे सूत्र पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. मालदीवच्या राजकीय पक्षांनी म्हटले आहे की, परदेशी कामगारांना येथे दयनीय परिस्थितीत रहावे लागते. येथे रहाणार्या परदेशी कामगारांपैकी बहुतांश कामगार हे भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांतील आहेत. कोरोनाच्या काळात या परदेशी कामगारांच्या दयनीय स्थितीचे प्रकरण पहिल्यांदा जगासमोर आले होते. त्या वेळी कोरोनाचे संक्रमण त्यांच्यामध्ये स्थानिक लोकांपेक्षा तिप्पट वेगाने झाले होते.