महाराष्ट्रातून ‘पी.एफ्.आय.’ २७ जणांना अटक !

संभाजीनगर, सोलापूर, ठाणे, मालेगाव आदी ठिकाणी धाडी !

संभाजीनगर – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) ‘पी.एफ्.आय.’च्या ठिकाणांवर धाडी टाकून संभाजीनगर येथून १३ जणांना, तर सोलापूर येथून एका संशयिताला अटक केली. ही कारवाई २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री करण्यात आली. संभाजीनगर येथे १३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यासह उर्वरित मराठवाड्यातून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाडा येथे आतापर्यंत ‘पी.एफ्.आय.’च्या एकूण २१ जणांना अटक करण्यात आली आहे.

जुन्या संभाजीनगर परिसरात पोलिसांनी १३ जणांवर लक्ष ठेवले होते. ‘पी.एफ्.आय.’च्या महाराष्ट्र अध्यक्षाला संभाजीनगर येथे पकडण्यात आले होते. त्याच्यासह इतरांच्या चौकशीतून या १३ जणांची नावे समोर आली होती. सोलापूर येथे कह्यात घेतलेल्या संशयिताला ‘एन्.आय.ए.’ने पहाटेच देहली येथे नेले आहे. मालेगाव येथेही प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून २ जणांना कह्यात घेतले आहे.

ठाणे जिल्ह्यातून ४ कार्यकर्ते अटकेत

ठाणे  – २७ सप्टेंबरच्या सकाळी मुंब्रा येथून २, तर भिवंडी आणि शिळफाटा येथून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे युनिट १, खंडणीविरोधी पथक, मालमत्ताविरोधी पथक युनिट ५ आणि झोन १ या पथकांनी ही कारवाई केली. समाजविघातक कृत्य करणार्‍या आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या अवैध कृत्यामध्ये सहभागी झाल्याविषयी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.