स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेकडून त्रिपिंडी श्राद्ध करवून घेणे आणि प्रत्यक्षात ८ दिवसांनी ‘सर्व साधकांच्या पितरांना गती मिळावी’, यासाठी सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी पितृतर्पण करणे

१. स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘त्रिपिंडी श्राद्ध’ करायचे राहिले असल्याने तो विधी रामनाथी आश्रमात करून घेऊ’, असे सांगणे आणि तसे करून घेणे

पितृतर्पण करतांना पू. पृथ्वीराज हजारे आणि पौरोहित्य करतांना पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के)

‘१०.२.२०१९ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पादुकाधारण सोहळा झाला. सोमवार, ११.२.२०१९ या दिवशी पहाटे मला स्वप्न पडले. त्या वेळी मला स्वप्नात दिसले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणत होते, ‘त्रिपिंडी श्राद्ध’ करायचे राहिले आहे. तो विधी इथे करून घेऊ.’ त्यानंतर तो विधी करण्यासाठी मी सर्व सिद्धता केली. श्री. वझेकाकांनी (सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी) एका सुपात श्राद्धासाठी लागणारे तीळमिश्रित भाताचे पिंड बनवले आणि तो संपूर्ण विधी माझ्याकडून करून घेतला. नंतर मी परात्पर गुरुदेवांना म्हणाले, ‘गुरुदेव, तुम्ही हा विधी माझ्याकडून करून घेतलात. मला काशी किंवा गया येथे जायची आवश्यकता नाही; कारण आता रामनाथीत प्रत्यक्ष गंगा अवतरली आहे. येथेच तुम्ही हा विधी करून घेतलात.’

२. स्वप्न चालू असतांनाच ध्वनीक्षेपकावर शिवाविषयी लागलेली गाणी ऐकून जाग येणे आणि शिवाची आठवण येऊन कृतज्ञता वाटणे

आम्ही निवासाला असलेल्या परिसरात सकाळी ध्वनीक्षेपकावर प्रतिदिन वारानुसार देवतांची गाणी लावतात. हे स्वप्न चालू असतांनाच मला जाग येऊन शिवासंबंधी गाणी ऐकू आली. मला शिवाची पुष्कळ आठवण येऊन कृतज्ञता वाटली. तेव्हा मला वाटत होते, ‘विधी आताही चालू आहे.’  ‘परात्पर गुरुदेवांना आपल्या पूर्वजांचीही किती काळजी आहे !’, असे मला वाटले.

३. परात्पर गुरुदेवांनी सर्व साधकांच्या पितरांना गती मिळावी; म्हणून पू. हजारेकाकांच्या माध्यमातून पितृतर्पणविधी करवून घेणे

१९.२.२०१९ या दिवशी गुरुदेवांनी सर्व साधकांच्या पितरांना गती मिळावी; म्हणून सनातन संस्थेचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारेकाका यांच्या माध्यमातून देवपितर, ऋषीपितर आणि मनुष्यपितर यांना गती देणारा पितृतर्पणविधी करून घेतला. प्रत्येक साधकाचे मन जाणणारी धन्य धन्य ती गुरुमाऊली ! ‘मला पामराला याची अनुभूती दिली’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञ आहे गुरुदेव !’

– सौ. धनश्री शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०१९)