आतंकवादी टायगर मेमन याच्या धमकीनंतर याकूब मेनन याच्या कबरीची सजावट करण्यात आली !

आतंकवादी याकूब मेनन याच्या कबरीचे सजावट केल्याचे प्रकरण

मुंबई – मुंबई येथील साखळी बाँबस्फोटांत हात असलेला आतंकवादी याकूब मेमन याच्या कबरीचे रूपांतर स्मारकामध्ये करण्याची धमकी बाँबस्फोट प्रकरणातील पसार आरोपी टायगर मेमन याच्या नावाने दिली होती, अशी माहिती बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिली आहे. ‘टायगर मेमन याच्या सूचनांचे पालन न केल्यास तुम्ही या जगातून बेपत्ता व्हाल’, अशीही धमकीही सदर व्यक्तीला देण्यात आली होती, असे वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने ९ सप्टेंबर या दिवशी दिले आहे.
बडा कब्रस्तान येथील काही जागा मेमन कुटुंबियांच्या नावाने करण्यासाठी मेमन कुटुंबियांशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा करणार्‍या महंमद मेमन याने तगादा लावला होता; मात्र ‘हे काम माझ्या अखत्यारीत येत नसून त्याविषयी निर्णय घेता येणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले होते’, असे संबंधित व्यक्तीने म्हटले आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीला दूरभाष आणि संदेश पाठवून ही मागणी अशीच केली जात होती. त्यानंतरही संबंधित व्यक्तीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने महंमद मेमन याने धमकी देण्यास प्रारंभ केला, असे तक्रारदाराने म्हटले आहे.