हणजुणे येथील वादग्रस्त ‘कर्लिस’ उपाहारगृहाजवळील बंद खोलीत कुजलेला मृतदेह आढळला !

‘कर्लिस’ उपाहारगृह, हणजुणे

पणजी, ६ सप्टेंबर (वार्ता.) – हणजुणे येथील वादग्रस्त ‘कर्लिस’ उपाहारगृह पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे. या उपाहारगृहानजीक काही अंतरावर असलेल्या एका बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे. यामुळे पुन्हा संशयाचे वादळ घोंगावत आहे. मागील आठवड्यात ‘कर्लिस’ उपाहारागृहामध्ये अभिनेत्री तथा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांना बलपूर्वक घातक अमली पदार्थ पाजवून त्यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर ‘कर्लिस’ उपाहारागृह राष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकले होते.

‘कर्लिस’ उपाहारगृहाचे मालक एडवीन न्यूनीस यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल राखीव

‘नार्काेटिक्स ड्रग्स अँड सायोकोट्रॉपिक सब्टान्सीस’ न्यायालयाने ‘कर्लिस’ उपाहारगृहाचे मालक एडवीन न्यूनीस यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल ६ सप्टेंबर या दिवशी राखीव ठेवला आहे. न्यायालय यासंबंधीचा निकाल ७ सप्टेंबर या दिवशी दुपारी देण्याची शक्यता आहे. गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट हत्येच्या प्रकरणी एडवीन न्यूनीस आणि अन्य २ अमली पदार्थ व्यावसायिक यांना २७ ऑगस्ट या दिवशी कह्यात घेतले होते.

सोनाली फोगाट हत्या प्रकरण : २ संशयितांच्या कोठडीत वाढ

अभिनेत्री तथा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंह यांच्या पोलीस कोठडीत म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने २ दिवसांनी वाढ केली आहे. सोनाली फोगाट यांची २२ ऑगस्ट या दिवशी हत्या झाल्यानंतर दोन्ही संशयितांना पोलिसांनी कह्यात घेतले होते.