पणजी – सोनाली फोगाट हत्येच्या प्रकरणानंतर हणजुणे येथील ‘कर्लिस’ उपाहारगृह आणि त्याचे मालक एडवीन न्युनीस सध्या एक चर्चेचा विषय झाला आहे. प्राप्त माहितीनुसार मालक एडवीन न्युनीस हा गोव्यात नव्याने येणारे पोलीस अधिकारी (‘आय.पी.एस्.’), वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस यांना मेजवान्या, तसेच सर्व सोयीसुविधा देत होता. यामुळे त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. सोनाली फोगाट प्रकरणाचे अन्वेषण थेट वरिष्ठ अधिकार्यांकडे पोचल्याने या प्रकरणी स्थानिक पोलिसांचे काही चालले नाही. ‘बाबू’ नावाचा व्यक्ती एडवीन न्युनीस याच्याशी समन्वय करून पोलिसांना मेजवानी आणि हप्ते देण्याचे काम पहात होता. ‘आम्हाला तुम्ही सांभाळा, तुम्हाला आम्ही सांभाळतो’ या तत्त्वानुसार एडवीन न्युनीस आणि स्थानिक पोलीस यांचे व्यवहार चालू होते. स्थानिकांनी आवाज उठवल्यास पोलीस कोणतीच कारवाई करत नसत, तर याउलट ‘कर्लिस’ उपाहारगृहाच्या विरोधात आवाज उठवणार्याचा काटा काढण्याचे कटकारस्थान रचले जायचे.
स्थानिक पोलिसांमुळे भाग्यनगर पोलिसांना एडवीन न्युनीसचा शोध घेता आला नाही
भाग्यनगरचे पोलीस सुमारे १५ दिवसांपूर्वी एडवीन न्युनीस याला कह्यात घेण्यासाठी गोव्यात आले होते. यासाठी त्यांनी गोवा पोलिसांचे सहकार्य घेतले होते. गोवा पोलिसांनी त्यांना त्यांच्या जीपमधून फिरवले; मात्र त्यांना एडवीन न्युनीस सापडू शकला नाही. भाग्यनगर पोलीस ‘कर्लिस’ उपाहारग्रहात पोचले, तेव्हा एडवीन न्युनीस तेथून पसार झाला होता.
https://t.co/rhKhitiTJ2 @goacm @CPHydCity @goacm @BJP4Goa @PMOIndia
— Goemkarponn (@goemkarponnlive) September 2, 2022
भाग्यनगर पोलिसांची सर्व कृती गोवा पोलीस एडवीन न्युनीस यांच्यापर्यत पोचवत होते का ? याविषयी संशय आहे. स्थानिक पोलिसांना अमली पदार्थ व्यवहार कुठे चालतो ? याची आणि यामध्ये कोण गुंतलेला आहे ? याची सविस्तर माहिती असते. पोलीस याकडे डोळेझाक करतात आणि नायजेरिया आणि रशिया येथील नागरिकांना पकडून किंवा अन्य एक-दोघांना पकडून कारवाई केल्याचा देखावा करतात; मात्र पोलीस मासाच्या अखेर स्वतःचे खिसे भरण्यासाठी संबंधित ठिकाणी जातात. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई करण्याची हिंमत पोलिसांना कशी होणार ? असे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ मासांत अमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढणार असल्याचे वक्तव्य केले आहे; मात्र पोलिसांना अमली पदार्थ व्यावसायिकांकडून मिळणारे हप्ते महत्त्वाचे कि मुख्यमंत्र्यांचा आदेश ? ते पहावे लागेल.
भाग्यनगर पोलिसांचा आरोप तथ्यहीन ! – जसपाल सिंह, पोलीस महासंचालक
पणजी – अमली पदार्थ व्यवसायाशी निगडित अन्वेषणासाठी गोवा पोलिसांचे आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचा आरोप भाग्यनगर पोलिसांनी केला आहे. भाग्यनगर पोलिसांचा हा आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिले आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
ते म्हणाले, ‘‘अमली पदार्थ व्यवसायाला अनुसरून अन्वेषण करण्यासाठी भाग्यनगर पोलिसांनी गोवा पोलिसांचे कधीही सहकार्य मागितलेले नाही. ‘भाग्यनगर पोलिसांनी गोवा पोलिसांचे कधी सहकार्य मागितले’, याविषयी लेखी माहिती देण्याचे आवाहन भाग्यनगर पोलिसांकडे करण्यात आले आहे. आंतरराज्य होणारे गुन्हे कसे हाताळावेत ? याची गोवा पोलिसांना माहिती आहे, तरीही भाग्यनगर पोलिसांनी प्रसारमाध्यमाच्या समोर गोवा पोलिसांविषयी अशी माहिती का दिली ? भाग्यनगर पोलिसांचा यामागील हेतू काय होता ? हे पहावे लागणार आहे.’’