मुंबई, २४ ऑगस्ट (वार्ता.) – मुंबई महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये चालू असलेल्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ चालवण्याविषयीच्या निविदेमध्ये पादर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करत या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, एका विशिष्ट कंत्राटदाराला ही निविदा मिळावी म्हणून त्यात अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत. ज्या आस्थापनाला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, त्या आस्थापनाने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बनावट आणि खोटे आहे. पडताळणी न करताच आस्थापनाला काम प्रस्तावित केले आहे. हे काम तांत्रिक असल्याने कामांचे तांत्रिक गुणांकन होणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. निविदेविषयी आयटी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, तांत्रिक सल्लागार आणि आस्थापनाचे अधिकारी यांच्यात वारंवार संभाषण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारचे संवाद का झाले ? त्यांच्यात झालेले हे संवाद थेट भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहेत. त्यामुळे तातडीने ही निविदा प्रक्रिया रहित करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच फेरनिविदा काढण्यात यावी.