डोळ्यांच्या रक्षणासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या !

१. संगणकावर काम करतांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ?

अ. ‘डोळ्यांची अधूनमधून उघडझाप करावी.
आ. डोळ्यांवर पडणारा ताण न्यून करण्यासाठी २०-२०-२० चा नियम उपयोगात आणावा, म्हणजे प्रत्येक २० मिनिटांनंतर साधारणपणे २० फूट लांब असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पहावे.
इ. अक्षरांचा आकार मोठा ठेवावा.
ई. संगणकाच्या पडद्याची चमक वातावरणाच्या उजेडापेक्षा अधिक नसावी. त्याप्रमाणे पडद्याचा चमकदारपणा उणे-अधिक करावा. रात्रीच्या वेळी पडद्याचा चमकदारपणा न्यून करावा; अन्यथा त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होईल.
उ. मासातून २ – ३ दिवस भ्रमणभाष अथवा भ्रमणसंगणक बंद ठेवून डोळ्यांना पूर्ण विश्रांती द्यावी.

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

ऊ. संगणकासाठी उपयुक्त असलेल्या काचांच्या चष्म्याचा उपयोग करावा.
ए. दोन मिनिटे थांबून डोळ्यांचे व्यायाम करावेत, म्हणजे आजूबाजूला किंवा वर-खाली पहावे आणि थोडा वेळ डोळे बंद करावेत.
ऐ. डोळ्यांवर पाण्याचे हबकारे मारून थोडा वेळ डोळे बंद ठेवावेत.
ओ. डोळे ओले रहावेत; म्हणून विशिष्ट प्रकारचे थेंब (वैद्यकीय समुपदेशानुसार) डोळ्यांत टाकावेत.
औ. संगणकाच्या पडद्यापासून २२ ते २८ इंच लांब बसावे. अतिजवळ किंवा अतिलांब बसण्याने डोळ्यांवर ताण पडतो.
अं. टंकलेखन करतांना मनगट सरळ रेषेत राहील, असे पहावे.
क. उंची उणे-अधिक करता येणारी आसंदी वापरावी. तुमचे पाय सतत भूमीला टेकलेले असावेत.
ख. ‘संगणकाच्या पडद्यावर प्रकाश परावर्तित होत नाही ना ?’, हे पहावे.
ग. मनगट आणि हात भूमीला समांतर रहातील, अशा पद्धतीने कळफलक (कीबोर्ड) ठेवावा.
घ. मध्ये मध्ये उठून थोडा वेळ इकडे-तिकडे फिरावे.

२. इतर वेळी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ?

अ. वाचतांना आणि लिहितांना दिव्याचा प्रकाश सरळ डोळ्यांवर न पडता मागच्या बाजूने किंवा डाव्या बाजूने येईल, असे आयोजन करावे. दिवसासुद्धा सूर्याचे किरण डोळ्यांवर अथवा संगणकावर / पुस्तकावर सरळ पडू देऊ नयेत.
आ. डोळ्यांना ताण पडेल, अशा अपुर्‍या प्रकाशात, तसेच पुष्कळ झगझगीत प्रकाशात वाचू किंवा लिहू नये.
इ. अतिशय बारीक किंवा अस्पष्ट अक्षरांचे लिखाण वाचू नये.
ई. जलद गतीने चालणार्‍या किंवा वर-खाली होणार्‍या वाहनातून जातांना वाचन करू नये.
उ. झोपून, आडवे पडून, तक्क्याला रेलून पुस्तक वर घेऊन वाचू नये. वाचतांना पुस्तक नेहमी डोळ्यांखाली असावे.
ऊ. शीर्षासन, तसेच सर्वांगासन केल्याने डोळे तेजस्वी होतात.
ए. डोळे जळजळत अथवा लाल होत असतील किंवा कंटाळा आल्याने थकले असतील, तर डोळे बंद करून आडवे झोपावे आणि शवासन करावे. नंतर दीर्घ श्वास घेऊन दूरच्या झाडांकडे दृष्टी टाकावी. डोळ्यांवर गार पाणी शिंपडावे आणि डोळे बंद करून विश्रांती घ्यावी.
ऐ. मस्तक, कान, नाक, मान, कपाळ, डोळे, गाल, तसेच हनुवटीखालचा कंठमण्याचा कोमल भाग या सर्व अवयवांना हलक्या हाताने मालीश करावे. यामुळे रक्ताभिसरण जलद होईल आणि डोळे निकोप होतील. असे आठवड्यातून निदान दोनदा तरी करावे.

३. डोळ्यांसाठी करावयाचे विशिष्ट व्यायाम

अंथरुणात पडल्या पडल्या किंवा बसून किंवा उभ्याने हे व्यायाम करता येतील.

अ. शक्य तितके दूर, उजव्या, डाव्या बाजूला आणि वर-खाली, तसेच चारही बाजूंना सतत बघण्याचा प्रयत्न करावा.
आ. डोळ्यांची भरभर उघडझाप करावी.
इ. अशीच उघडझाप एका पाठोपाठ एका डोळ्याची करावी, म्हणजे एक डोळा बंद करून दुसरा उघडावा. ही क्रिया जलद करावी.
ई. दोन्ही डोळे क्षितिजाकडे स्थिर करून गोल फिरवावेत.
उ. रात्री उघड्यावर झोपावे आणि झोपल्या झोपल्या दूर आकाशात, चंद्र, तारे यांच्याकडे डोळ्यांत पाणी येईपर्यंत एकटक बघत रहावे.
ऊ. चालतांना दूरच्या झाडावर, घरावर, विजेच्या खांबावर दृष्टी लावून चालण्याची सवय लावून घ्यावी. याने डोळ्यांचे तेज वाढते.

४. डोळ्यांचे आजार आणि त्यावरील होमिओपॅथीची औषधे

अ. शिवणकाम केल्याने, बारीक अक्षर वाचल्याने, संगणकावर सातत्याने काम केल्याने डोळ्यांवर ताण पडून डोके दुखणे, डोळे लाल होऊन गरम होणे – ‘रूटा ३० किंवा २००’
आ. अकस्मात् डोळे येणे, डोळ्यांमधून पुष्कळ स्राव येऊन पापण्यांना सूज येणे, वेदना होणे; रात्री, उबदार हवामानामध्ये दुखणे बळावणे, मोकळ्या हवेमध्ये बरे वाटणे – ‘ॲकोनाइट ३०’
इ. डोळ्याला मार लागल्याने डोळ्याला सूज येणे, डोळ्याच्या बाजूची त्वचा काळी होणे – ‘अर्निका ३०’
ई. डोळ्याला सूज येणे; परंतु डोळ्यांतून पाणी न येणे, डोळ्यांच्या पापण्या लाल होणे, बाहुल्या मोठ्या होणे, रात्रीच्या वेळी त्रास बळावणे – ‘बेलाडोना ३०’
उ. डोळ्यांमध्ये वेदना होऊन डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यांतून जळजळीत स्राव येणे, डोळे उघडायला कठीण जाणे, मध्यरात्रीनंतर बळावणे, गरम शेक दिल्याने बरे वाटणे – ‘आर्सेनिक आल्ब ३०’
ऊ. डोळ्यांना सूज येऊन डोळे उघडणे कठीण होणे, कापल्यासारख्या वेदना होणे, डोळ्यांतून पू येणे – ‘मर्क्यूरीस सोल ३०’
ए. डोळे येणे, पापण्यांना सूज येऊन त्यांची आग होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, सायंकाळी आणि खोलीमध्ये असल्यास डोळ्यांतून सतत पाणी येण्याचे प्रमाण वाढणे, काळोखात अन् मोकळ्या हवेत बरे वाटणे – ‘युफ्रेशिया ६ किंवा ३०’
ऐ. दोन-दोन दिसणे, बुबुळांना सूज येऊन वेदना होणे – ‘जल्सेमियम ३०’
ओ. डोळ्यांतून घट्ट पिवळा स्राव येणे, सकाळी उठल्यानंतर पापण्या चिकटणे, डोळे चोळल्याने पापण्या चिकटण्याचे प्रमाण वाढणे, मोकळ्या हवेमध्ये बरे वाटणे – ‘पल्सेटिला ६ किंवा ३०’
औ. डोळ्यांमध्ये काहीतरी गेल्याने डोळ्याला सूज येणे – ‘सिलिशिया ३०’

५. डोळ्यांचे आजार आणि त्यांवर उपयुक्त बाराक्षार औषधे

अ. डोळ्याच्या कोणत्याही भागाचा दाह; परंतु पू झालेला नसणे किंवा स्राव नसणे; वेदना, डोळ्यांची हालचाल केल्याने वेदनांत वाढ होणे. डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, ‘पापणीच्या खाली वाळूचे कण आहेत’, असे वाटणे, दृष्टी अधू होणे, वाचतांना अक्षरे अंधुक दिसणे, उजव्या डोळ्याच्या खालच्या पापणीवर रांजणवाडी येणे, गार पाण्याच्या स्पर्शाने बरे वाटणे, डोळे कोरडे असणे – ‘फेरम फॉस ६x’
आ. डोळ्यांतून पांढरा किंवा पिवळसर, हिरवट स्राव वहाणे; ‘डोळ्यांमध्ये वाळूचे कण गेले आहेत’, असे वाटणे, डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्याला (Cornea) व्रण होणे, जिभेवर पांढरा पातळ थर येणे, मोतीबिंदू, प्रकाश सहन न होणे आणि डोळ्यांतून सतत पाणी येणे – ‘काली मूर ६x’
इ. अंधुक दिसणे, ‘डोळ्यांमध्ये वाळू किंवा काठी गेली आहे’, असे वाटणे, डोळ्यांच्या कडांना सूज येणे, प्रकाश सहन न होणे आणि डोळ्यांची आग होणे – ‘काली फॉस ६x’
ई. डोळ्याच्या पापणीवर पिवळसर खपली धरणे, डोळ्यांतून हिरवटसर, पिवळा स्राव वहाणे आणि डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्यामध्ये पू होणे – ‘काली सल्फ ६x’
उ. पापण्या खाली येणे (drooping), उजेड सहन न होणे, बाहुल्या लहान होणे, डोळ्यासमोर रंग, ठिणग्या दिसणे; पापण्या जोरात उडणे आणि वस्तू दोन दिसणे – ‘मॅग फॉस ६x’
ऊ. डोळ्यांतून पाणी गळणे, डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडणे, डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्यावर फोड येणे, डोळ्यांतून पाण्यासारखा चिकट स्राव येणे, रांजणवाडी झाली असता डोळ्यांतून पाणी गळणे, गार पाण्याच्या स्पर्शाने बरे वाटणे, उजव्या डोळ्यावर रांजणवाडी येणे, काचबिंदू होणे – ‘नेट्रम मूर ६x’
ए. डोळ्यांचा दाह, सोनेरी, पिवळसर, मलईदार स्राव डोळ्यांतून वहाणे; सकाळी पापण्या एकमेकांना चिकटणे, डोळ्यांतून जळजळणारे पाणी वहाणे, डोळे रक्ताप्रमाणे लाल होणे, दृष्टी उणावणे, ‘डोळ्यांसमोर पडदा आला आहे’, असे वाटणे, डोळ्यांसमोर ठिणग्या दिसणे – ‘नेट्रम फॉस ६x’
ऐ. डोळ्यांच्या पापणीवर वेदना होणे, पापण्यांच्या आतला पदर (Conjunctiva) पिवळा होणे, डोळ्यांचा दाह होणे आणि त्यासह डोळ्यांतून जळजळणारे पाणी येणे, डोळ्यांच्या कड्यांची आग होणे – ‘नेट्रम सल्फ ६x’
ओ. पापणीवर रांजणवाडी होणे, रांजणवाडीमध्ये पू झाला असल्यास त्याचा सहजपणे निचरा होण्यासाठी गरम पाण्याने शेक दिला असता बरे वाटणे, रांजणवाडी वारंवार येण्याची प्रवृत्ती, पायांवर येणारा घाम इतर औषधे घेऊन बंद केला असता परिणामस्वरूप मोतीबिंदू होणे – ‘सिलिशिया ६x’
औ. मोतीबिंदूची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त, लहान मुलांचे दात येत असतांना होणारा डोळ्याचा कोरडा दाह (डोळ्यांतून पाणी येत नाही), प्रकाश सहन न होणे, डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्याची पारदर्शकता न्यून होणे (Corneal opacity) – ‘कल्केरिया फॉस ६x’
अं. डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्याला व्रण होणे, नेत्रदाह, डोळ्यांतून जाड पांढरा स्राव येणे, ‘डोळ्यांमध्ये काहीतरी गेले आहे’, असे वाटणे – ‘कल्केरिया सल्फ ६x’
क. डोळ्यांसमोर ठिणग्या दिसणे, डोळ्यांना ताण दिल्याने अंधुक दिसणे, मोतीबिंदू.’ – ‘कल्केरिया फ्लोर ६x’

६. औषध घेण्याचे प्रमाण

६ अ. होमिओपॅथीचे औषध घेण्याचे प्रमाण : ‘३० किंवा २०० पोटेंसी’चे २ थेंब ३ वेळा घ्यावेत किंवा ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा घ्याव्यात.
६ आ. बाराक्षार औषध घेण्याचे प्रमाण : ‘६x पोटेंसी’च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा घ्याव्यात.

७. औषध घरी ठेवायचे असल्यास ते कसे ठेवावे ? तसेच औषधी गोळ्या सिद्ध करण्याची प्रक्रिया

७ अ.  ७ -८  जणाच्या एका कुटुंबासाठी ही औषधे घरी ठेवायची असल्यास :

१. द्रव्य स्वरूपातील औषध १५ मि.लि.
२. कोणतेही औषध सिद्ध करण्यासाठी आवश्यक ३० क्रमांकाच्या गोळ्या किमान पाव किलो
३. एक ड्रॅम आकाराच्या प्लास्टिकच्या बाटल्या
४. बाटल्यांवर औषधाचे नाव लिहिण्यासाठी लेबल्स
५. बाराक्षार औषधाच्या गोळ्या ‘६x  पोटेंसी’च्या २५ ग्रॅम.

७ आ. औषधी गोळ्या सिद्ध करण्याची प्रक्रिया :

१. एक ड्रॅमची बाटली स्वच्छ पुसून त्यात गोळ्या भराव्यात.
२. त्यात जे औषध सिद्ध करायचे आहे, त्याचे द्रव ७ ते ८ थेंब घालावे.
३. झाकण बंद करून बाटली व्यवस्थित हलवावी, जेणेकरून सर्व गोळ्यांना ते द्रव लागून त्या ओल्या होतील.
४. औषधाचे नाव आणि त्याची ‘पोटेंसी’ लेबलवर लिहून लावावी.
५. बाराक्षार औषधाच्या गोळ्याही लेबल लावून ठेवाव्यात. त्यात कुठेही द्रव घालण्याची आवश्यकता नसते.

 संकलक : होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.३.२०२०)