१. त्रास होत असूनही देवावर दृढ श्रद्धा असणे
‘(कै.) सौ. शालिनी मराठेकाकू कर्करोगाने आजारी असतांना त्यांना दुपारचा महाप्रसाद देण्याची सेवा माझ्याकडे होती. आरंभी त्या व्यवस्थित जेवण घेत होत्या; पण त्यांच्यावर कर्करोगावरील किरणोपचार (रेडिएशन) पद्धतीचे उपचार चालू झाल्यावर त्यांच्या जेवणाचे प्रमाण न्यून होऊ लागले, तरीही त्यांच्या चेहर्यावर जराही थकवा किंवा त्रास जाणवत नसे. ‘माझे प्रारब्ध असे का आहे ? मला हे का भोगावे लागत आहे ?’, असे कुठलेच प्रश्न त्यांच्या चेहर्यावर दिसत नसत. ‘देवानेच मला येथे आणले आहे आणि हे सहन करण्यासाठी देवच मला शक्ती देणार आहे’, असे त्या नेहमी म्हणत असत.
२. इतरांचा विचार करणे
२ अ. जेवण जात नसतांनाही ‘सेवेसाठी इतरांचा वेळ जाऊ न देता स्वतःला सक्षम रहाता यावे’, यासाठी काकूंनी थोडे थोडे द्रव पदार्थ घेणे : प्रत्येक वेळी काकूंना महाप्रसाद (जेवण) देण्यापूर्वी मी काकूंना ‘आज तुम्हाला जेवायला काय आणू ?’, असे विचारायचे. त्या वेळी त्या म्हणायच्या, ‘‘मला जेवण काही जात नाही; पण मला एवढ्या गोळ्या खायच्या आहेत. त्यासाठी काहीतरी खाल्ले पाहिजे; म्हणून मला जेवण द्या.’’ त्या थोडे थोडे द्रव पदार्थ उदा. कधी वरणाचे पाणी, ताक, आंबील अशा प्रकारचे जेवण घेत होत्या. तेव्हा जेवण जात नसतांनाही ‘आपल्या सेवेसाठी साधकांचा वेळ जाऊ नये’, यासाठी त्या स्वतःला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे मला वाटले.
२ आ. सेवा करणार्या साधिकेच्या प्रती कृतज्ञताभाव असणे : मी काकूंना जेवण द्यायला जायचे, तेव्हा प्रत्येक वेळी त्या मला म्हणायच्या, ‘‘तुम्ही माझ्यासाठी किती करता !’’ प्रत्यक्षात मी त्यांच्यासाठी फार काही करत नव्हते; पण त्यांच्या बोलण्यातून त्यांचा इतरांविषयीचा विचार अधिक जाणवायचा. जेवण आणल्यावर मी त्यांना सांगायचे, ‘‘काकू, गरम गरम जेवण आणले आहे. लवकर खाऊन घ्या.’’ तेव्हा माझे म्हणणे ऐकून त्या लहान मुलीसारखे म्हणायच्या, ‘‘हो. तुम्ही म्हणता ना, तर घेते हं !’’
३. सकारात्मकतेने परिस्थिती स्वीकारणे
थोड्या दिवसांनी त्यांची तब्येत पुष्कळच खालावली. त्या वेळी त्यांना थोडेही अन्न जात नव्हते. कुठलाही पदार्थ घेतला, तरी त्यांना लगेच उलटी येत होती. त्या वेळी वैद्य मेघराज पराडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना जेवणाचे पदार्थ देत होतो. ही स्थितीही काकूंनी अगदी सकारात्मकतेने स्वीकारली होती.
४. सतत गुरुदेवांच्या स्मरणात राहून कृतज्ञताभावाने जगणे
एक दिवस त्यांच्या पोटात पुष्कळ दुखत होते. काकूंनी हे मला सांगितल्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘काकू, मी तुमच्यावरचे त्रासदायक आवरण काढते.’’ मग मी त्यांच्यावरील आवरण काढले. तेव्हा त्यांना छान झोप लागली. त्यानंतर थोड्या वेळाने काकू उठून बसल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘देवानेच तुम्हाला हा विचार दिला.’’ यावरून ‘काकूंची प्रत्येक कृती आणि विचार हा देवाशीच संबंधित आहे आणि त्या प्रत्येक वेळी गुरूंचेच स्मरण करत शरणागतभावाने जगण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
५. कृतज्ञता
गुरुदेवा, केवळ तुमच्या कृपेमुळेच मला सौ. मराठेकाकूंची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, फोंड, गोवा. (१६.७.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |