सांगलीत शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना व्हावा ! – नीता केळकर, भाजप

सांगली – मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी सांगलीत शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना व्हावा. त्यासाठी सांगलीमध्ये असलेली आणि रेल्वेशी संलग्न अशी ४ सहस्र एकर भूमी उपलब्ध होऊ शकते. सांगलीला लागून असलेल्या राज्यांच्या सीमेवर हा प्रकल्प झाल्यामुळे आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांना याचा लाभ होईल, असे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. नीता केळकर यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची देहली येथे भेट घेऊन दिले. सौ. नीता केळकर यांच्या समवेत आनंद दिघे यांच्या भगिनी श्रीमती फासे उपस्थित होत्या.

संरक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसच्या काळामध्ये ‘आय.एन्.एस्. शिवाजी’ हे नौदलाचे अभियांत्रिकी महाविद्यालय जे महाराष्ट्रात होणार होते, ते स्थानांतर करून केरळमध्ये नेले, यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये असंतोष आहे. सांगलीत कारखाना चालू करण्यासाठी शासकीय पातळीवरून निर्णय घ्यावेत. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्व प्रकारच्या संमती आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप सांगली प्रयत्नशील राहील.