रेल्वेस्थानकावर असलेल्या मोठ्या पिवळ्या फलकावर संबंधित ठिकाणाचे नाव लिहिलेले असते. त्यावर केवळ स्थानकाचे नावच नाही, तर त्याखाली समुद्रसपाटीपासूनची उंचीही बोर्डवर लिहिलेली असते, उदा. MSL (Mean Sea Level) 214-42 Mts. वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवर ही संख्या वेगवेगळी असते. ती का लिहिली जाते ? याचा अर्थ काय ? याची थोडक्यात माहिती येथे देत आहोत.
देशातील जवळपास सर्वच रेल्वेस्थानकांच्या फलकावर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. कोणताही रेल्वेचालक आणि ‘गार्ड’साठी (रेल्वेच्या संरक्षक कर्मचार्यासाठी) हे चिन्ह अत्यंत महत्त्वाचे असते. कोणत्याही रेल्वेस्थानकावरील समुद्रसपाटीपासूनची उंची रेल्वेचे चालक आणि गार्ड यांना साहाय्य करण्यासाठी नमूद केली जाते. जेणेकरून रेल्वेचालकाला हे कळेल की, जर आपण उंचीच्या दिशेने जात आहोत, तर रेल्वेची गती किती ठेवायला हवी ? त्यासह गाडीच्या इंजिनला किती विद्युत् पुरवठा (पॉवर सप्लाय) द्यावा, जेणेकरून रेल्वे सहज त्या उंचीच्या दिशेने जाऊ शकेल. त्याचप्रमाणे रेल्वे जर समुद्रसपाटीच्या दिशेने जात असेल, तर ती किती वेगाने पुढे न्यायची ? हे सर्व जाणून घेण्यासाठी समुद्रसपाटीची उंची (MSL) लिहिलेली असते.
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)