सनातन संस्थेच्या वतीने नवी देहली, नोएडा, मथुरा (उत्तरप्रदेश) आणि फरिदाबाद (हरियाणा) येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

नवी देहली – मोक्षदायी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! यानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै २०२२ या दिवशी नवी देहली येथील मालवीयनगरमधील श्री गीता भवन मंदिर, उत्तरप्रदेशमधील नोएडाच्या सेक्टर १२ मधील ईशान म्युझिक सेंटर, मथुरामधील श्रीजी गार्डन सोसायटीमध्ये आणि फरिदाबादच्या सेक्टर २८ मधील रघुनाथ मंदिर येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाचा मोठ्या संख्येने जिज्ञासूंनी लाभ घेतला.

केवळ हिंदु राष्ट्रातच उत्तम शिक्षणपद्धतीचे पालन होऊ शकते ! – जगदीशचंद्र चौधरी, मुख्य संस्थापक तथा संचालक, बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, हरियाणा

श्री. जगदीशचंद्र चौधरी

फरिदाबाद – आज सर्वांगीण शिक्षणाची चर्चा केली जाते; परंतु हे शिक्षण भौतिकतेच्या दिशेने घेऊन जात आहे. ज्यात पूर्णत्व आणि स्वातंत्र्य यांचा अभाव आहे. भारतीय शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून मोक्षाचा मार्ग प्रशस्त करते. त्यामुळे केवळ हिंदु राष्ट्रातच उत्तम शिक्षणपद्धतीचे पालन होऊ शकते, असे प्रतिपादन ‘बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन’चे मुख्य संस्थापक आणि संचालक श्री. जगदीशचंद्र चौधरी यांनी केले.

फरिदाबाद येथे समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे, नोएडा येथील गुरुपौर्णिमेमध्ये सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री, तर मथुरा येथे सनातन संस्थेच्या कु. अक्षिता वार्ष्णेय यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

क्षणचित्र

  • मथुरा येथील गुरुपौर्णिमेचे मार्गदर्शन ऐकल्यावर काही जिज्ञासूंची भावजागृती होऊन भावाश्रू आले.

देशातील समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच उपाय ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

नवी देहली – भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा धर्मावर संकटे आली, तेव्हा तेव्हा समर्थ रामदासस्वामी-छत्रपती शिवाजी महाराज, आचार्य चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य अशा अनेक गुरु-शिष्यांनी सनातन हिंदु धर्माचे रक्षण केले. सध्या भारताच्या शिक्षणव्यवस्थेत धर्माला स्थानच नाही. त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर धर्माचा लोप होऊन देशात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय आहे. आपल्याला हे फार मोठे कार्य आहे, असे वाटत असेल; परंतु जेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला होता, तेव्हा सर्व गोपगोपींनी त्यांच्या काठ्या लावल्या होत्या. त्याप्रमाणे प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या कार्यात स्वतःचे योगदान देणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नवी देहली येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

देहली येथील गुरुपौर्णिमेमध्ये मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
देहली येथील गुरुपौर्णिमेला जिज्ञासूंची उपस्थिती
फरिदाबाद येथील गुरुपौर्णिमेला जिज्ञासूंची उपस्थिती