मराठवाड्यात ढगफुटीसदृश पाऊस !

  • सहस्रो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

  • अनेक घरांत शिरले पाणी

पूर परिस्थिती

 

नांदेड – जिल्ह्यासह मराठवाड्यात ८ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे, तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. पावसामुळे सहस्रो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले असल्याने सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती. पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा तिबार पेरणी करावी लागणार आहे. अर्धापूर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरले असून गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे.

परभणीच्या पालम तालुक्यातील १४ गावांचा संपर्क तुटला !

परभणी जिल्ह्यात पावसामुळे छोट्या-मोठ्या नदीनाल्यांना पाणी आले आहे. पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने १४ गावांचा संपर्क तुटला आहे. फळा, आरखेड, घोडा, सोमेश्वर, उमरथडी, सायळा, पुयणी, वन भुजवाडी, आडगाव, तेलाजपूर, कांदलगाव यांसह अन्य ३ गावांचा पालमपासूनचा संपर्क तुटला आहे.

वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वहात आहेत, तर निम्न वर्धा प्रकल्पाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने अनेक गावांत शिरले पाणी ! 

हिंगोली जिल्ह्यातही ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने संपूर्ण गावातील घरात पाणी शिरले आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक घरातील छतावर गेले आहेत. या ठिकाणी विद्युत् पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

सांगली-कोल्हापुरात पावसाची संततधार !

कोल्हापूर, ९ जुलै (वार्ता.) – गेले दोन दिवस पाऊस अल्प झालेला असतांनाच ८ जुलैच्या रात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार चालू आहे. यामुळे दोन दिवस पंचगंगा नदीची अल्प झालेली पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढली आहे. दुपारी १ वाजता पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ३१ फूट १ इंच इतकी नोंदवण्यात आली. सांगली जिल्ह्यातही ९ जुलै या दिवशी पावसाची संततधार होती.