अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर !

आज १० जुलै २०२२ या दिवशी देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) आहे. त्या निमित्ताने…

आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि कर्नाटक, तसेच आंध्रप्रदेश या राज्यांतील काही ठिकाणांहून वारकरी हातात भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ, पुरुष डोक्याला फेटा बांधून अन् स्त्रिया डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन श्री विठ्ठलाच्या गोजिऱ्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला येतात. वारकरी वारीमध्ये टाळ-मृदंगाच्या तालात विठ्ठलाच्या नामाचा गजर करत जातात. हे वारकरी तहान-भूक विसरून उन्हात आणि पावसात अनवाणी चालत असतात. त्यांचा भोळाभाव पाहून श्री विठ्ठलही वारकरीरूपी भक्तांना भेटण्यासाठी अत्यंत व्याकुळ झालेला असतो. देवाच्या कृपेने वारी आणि विठ्ठलाची भक्ती यांचे उलगडलेले आध्यात्मिक माहात्म्य येथे लेखबद्ध केले आहे.

१. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत धर्माची (हिंदु धर्माची) पताका सर्वत्र फडकावण्यासाठी आणि भाविक हिंदूंना संघटित करण्यासाठी  पंढरपूरच्या वारीची प्रथा चालू केलेली असणे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत धर्माची (हिंदु धर्माची) पताका सर्वत्र फडकावण्यासाठी आणि भाविक हिंदूंना संघटित करण्यासाठी पंढरपूरच्या वारीची प्रथा चालू केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदु समाजामध्ये पंढरपूरच्या वारीच्या रूपाने भक्तीची गंगा शतकानुशतके प्रवाहित होत आहे. वारकरी संप्रदाय स्थापन करून प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या २ तिथींना आपापल्या गावातून चालत पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची म्हणजे ‘वारी’ची प्रथा आरंभ केली. या प्रथेमागे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा भक्तीमय संकल्प कार्यरत आहे. त्यामुळे ही प्रथा अनेक शतकांपासून चालू आहे.

कु. मधुरा भोसले

२. पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्याच्या मुखावरील उत्कटभाव आणि आर्तता पाहून प्रत्येक गावातील भाविकांचा भाव अनावर होऊन त्यांचा कंठ विठ्ठलाच्या भेटीसाठी दाटून येणे

वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्याला तहान, भूक आणि चालण्याचे श्रम यांचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने त्यांच्या अंत:करणामध्ये विठ्ठलभक्तीची अखंड ज्योत तेवत असते. त्यामुळे वारकऱ्यांना श्री विठ्ठलाला भेटण्याची ओढ लागलेली असते. यालाच ‘भगवंताच्या भेटीसाठी आतुर होणे’, असे म्हणतात. या अवस्थेत वारकरीरूपी विष्णुभक्तांच्या हृदयात उत्कटभाव जागृत झालेला असतो. या उत्कटभावाचा आवेश इतका असतो की, प्रत्येक वारकरी श्री विठ्ठलाला भेटण्यासाठी चातक पक्षाप्रमाणे व्याकुळ झालेला असतो. ‘भगवंता, आता आम्हाला लवकरात लवकर तू दर्शन दे’, अशी एकच आर्त प्रार्थना त्यांच्या हृदयातून होत असते. त्यांच्या मुखावरील उत्कटभाव आणि आर्तता पाहून प्रत्येक गावातील भाविकाचा भाव अनावर होऊन त्यांचा कंठ विठ्ठलाच्या भेटीसाठी दाटून येताे.

३. पंढरपूरची भावपूर्ण वारी आणि आजीवन विठ्ठलभक्ती केलेल्या अनेक संतांना सायुज्य मुक्तीची प्राप्ती होणे

‘भक्तीमार्गी उपासक त्याच्या उपास्यदेवतेची भक्तीभावाने कशा प्रकारे उपासना करत असतो’, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पंढरपूरच्या वारीतील वारकरी ! अशा प्रकारे देहभान हरपून चालणारे वारकरी तुळशीच्या माळा आणि चंदनाचा टिळा यांच्या सुगंधासह भक्तीच्या गंधाने न्हाऊन निघालेले असतात. भगवंताची भक्तीभावाने उपासना केल्यामुळे भाविकाच्या हृदयामध्ये भक्तीरस पाझरल्याने त्याचे मन, बुद्धी, चित्त आणि अहं या सूक्ष्म देहांची अल्पावधीत शुद्धी होते. त्यामुळे भाविकाला भगवंताच्या सगुण रूपाशी एकरूप होणे संभव होते. अशा प्रकारे भावपूर्ण वारी आणि आजीवन विठ्ठलभक्ती केलेले संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत चोखामेळा, संत माणकोजी बोधला इत्यादी संतांना श्री विठ्ठलाच्या सगुण रूपाशी एकरूप होऊन सायुज्य मुक्तीची प्राप्ती करता आली.

४. बुलढाण्याहून पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये एक हरिण सहभागी होणे हा दैवी चमत्कारच असणे

गेल्या वर्षी बुलढाण्याहून पंढरपूरला निघालेल्या वारीमध्ये एक हरिणही सहभागी झाले होते. ते कीर्तनातही शांतपणे बसले होते. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. याचे चलत्चित्र सर्वत्र प्रसारित झाले होते. यावरून श्री विठ्ठलभेटीची ओढ केवळ मनुष्याला नव्हे, तर सात्त्विक पशूपक्ष्यांनाही असते, हे यावरून दिसून येते.

५. श्री विठ्ठलाच्या कृपेने महाराष्ट्रात भागवत धर्माची ही पताका अजूनही फडकत असणे

या वैज्ञानिक युगामध्ये मनुष्य चंद्र आणि मंगळ यांवर पोचला, तरीही भाविकांच्या हृदयातील विठ्ठलाच्या भक्तीचा झरा अजूनही अविरत वहात आहे. याचे श्रेय वारकरी संप्रदायातील समस्त संतांना जाते. या संताच्या मांदियाळीमुळे हिंदु समाजाच्या मनामध्ये अजूनही भगवंताच्या भेटीची आणि त्याच्या सहवासातील आनंद अनुभवण्याची ओढ टिकून आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा ‘हिंदु धर्मातील भक्तीउपासनेचा केंद्रबिंदू’ बनलेला आहे. वारीमध्ये कार्यरत झालेले धर्मतेज आणि भक्तीगंगा यांच्या मिलापाचे चैतन्य गावागावांतून प्रवाहित होऊन अनेक गावे श्री विठ्ठलाच्या भक्तीने न्हाऊन निघतात.
श्री विठ्ठलाच्या कृपेने महाराष्ट्रात भागवत धर्माची ही पताका अजूनही फडकत आहे.

६. आषाढी एकादशीला भक्त आणि भगवंत यांच्या भेटीच्या अलौकिक संगमाचा सोहळा पहाण्यास मिळणे

जेव्हा वेगवेगळ्या गावांतून आलेल्या वाऱ्या पंढरपूरला पोचतात आणि आषाढी एकादशीला त्यांना श्री विठ्ठलाचे पावन दर्शन होते, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नाही. ज्याप्रमाणे नदी तिच्या उगम स्थानापासून वहात सहस्रो मैलांचा प्रवास करून शेवटी सागराला येऊन मिळते, त्याप्रमाणे वारीमध्ये अनेक दिवसांचा पायी प्रवास करून वारकरी शेवटी पंढरपुरातील श्री विठ्ठलापर्यंत येऊन पोचतात. भक्त आणि भगवंत यांच्या भेटीच्या या अलौकिक संगमाच्या सोहळ्याचे वर्णन करण्यासाठी शब्दही थिटे पडतात.

७. आषाढी एकादशीला पंढरपूरला आलेल्या वारकरीरूपी भक्तांना भेटून श्रीहरिचे मन तृप्त होऊन तो ४ मास योगनिद्रामग्न होणे आणि अकार्यरत झालेले विष्णुतत्त्व कार्तिकी एकादशीला वारकरीरूपी विष्णुभक्तांच्या भक्तीमुळे पुन:श्च जागृत होणे

आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणातात; कारण या तिथीनंतर श्रीविष्णु क्षीरसागरात योगनिद्रेत मग्न होतो. आषाढी एकादशीला पंढरपूरला आलेल्या समस्त वारकऱ्यांच्या रूपातील भक्तांना भेटून श्रीहरिचे मन तृप्त होते आणि तो योगनिद्रामग्न होतो. त्यानंतर ४ मासांनंतर कार्तिकी एकादशीला भगवंताला पुन्हा भक्तांची आठवण झाल्यामुळे तो योगनिद्रेतून त्याच्या भक्तांना डोळे भरून पहाण्यासाठी जागृत अवस्थेत येतो. त्यामुळे कार्तिकी एकादशीला ‘देवप्रबोधिनी एकादशी’ असेही म्हणतात. या ४ मासांत अकार्यरत झालेले विष्णुतत्त्व वारकरीरूपी विष्णुभक्तांच्या भक्तीमुळे पुन:श्च जागृत होते. यावरून आपल्याला भक्तीचे महत्त्व लक्षात येते.

म्हणूनच शेवटी म्हणावेसे वाटले, ‘अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर …।’

८. कृतज्ञता

ईश्वराच्या कृपेने महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीमुळे अखंड भक्तीगंगा प्रत्येक वर्षी प्रवाहित होते आणि मनावर भगवंताच्या भक्तीचा संस्कार दृढ होतो. यासाठी समस्त विठ्ठलभक्त संतांच्या चरणी कोटीश: नमन करतात. ‘त्यांच्यासारखी भक्ती आम्हामध्ये निर्माण होऊ दे’, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी आर्त प्रार्थना आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२२)

श्री विठ्ठलाच्या एका भक्ताने त्याच्या चरणी भावपूर्ण केलेले प्रार्थनारूपी काव्य

ऐसे लाभो भान । देगा देवा जान ।
चरणात ध्यान राहुदेगा ।। १ ।।

अमृताची वेल । अमृताचा देह ।
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा ।। २ ।।

विठु तुझ्या दारी । भेटला श्रीरंग ।
मन झाले दंग माऊलीचे ।। ३ ।।

घडो तुझी प्रीत । वाढो तुझा संग ।
जीवनाचा रंग पाहुदेगा ।। ४ ।।

विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल…

– कु. मधुरा भोसले (८.७.२०२२)

बुलढाणा येथून पंढरपूरला निघालेल्या वारीमध्ये वारकऱ्यांसह सहभागी झालेले एक हरिण