न्यायाधिशांवर वैयक्तिक आक्रमणे करणे योग्य नाही ! – न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला

नूपुर शर्मा यांना उदयपूर येथील घटनेला उत्तरदायी ठरवल्याचे प्रकरण

न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला

नवी देहली – कोणत्याही निर्णयाविषयी न्यायालयावर होणारी टीका मान्य करता येईल; मात्र न्यायाधिशांवर वैयक्तिक आक्रमणे करणे योग्य नाही. असे अजिबात होता कामा नये, अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांनी व्यक्त केली. नूपुर शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी उदयपूर येथील घटनेला (कन्हैयालाल यांच्या हत्येला) नूपुर शर्मा यांनाच उत्तरदायी ठरवले होते. त्यावरून सामाजिक माध्यमांतून या दोघांवर टीका होऊ लागली आहे. त्यावरून न्यायमूर्ती पारडीवाला यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच त्यांनी सरकारला सामाजिक माध्यमांवर आळा घालण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. न्या. पारडीवाला एच्.आर्. खन्ना स्मृती कार्यक्रमात बोलत होते.

न्यायमूर्ती पारडीवाला यांनी म्हटले की,

१. न्यायाधिशांवर होणार्‍या वैयक्तिक आक्रमणांमुळे न्यायसंस्थेची हानी होत आहे आणि तिची प्रतिष्ठा अल्प होत आहे.

२. घटनात्मक न्यायालयांनी नेहमीच माहितीपूर्ण असहमती आणि रचनात्मक टीका स्वीकारल्या आहेत; परंतु न्यायाधिशांवर वैयक्तिक आक्रमणे रोखली आहेत.

३. भारतात सामाजिक माध्यमाचा वापर अनेकदा पूर्णपणे अवैध आणि घटनात्मक सूत्रांचे राजकारण करण्यासाठी केला जातो.

४. अर्धसत्य, अर्धवट माहिती ठेवणारे, कायदा, पुरावा आणि न्यायिक प्रक्रिया न समजणारे लोक वरचढ झाले आहेत.