भाजपच्या आमदाराच्या मुलीकडून वाहतुकीचे नियम मोडून वर पोलिसांशीच अरेरावी !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे भाजपचे आमदार अरविंद निंबावली यांच्या मुलीने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांशी अरेरावी केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. बी.एम्.डब्ल्यू. या अत्यंत महागड्या गाडीमधून प्रवास करत असलेल्या या मुलीने ‘सिग्नल’ मोडल्यानंतर पोलिसांनी तिला थांबवले असता त्यांच्याशी वाद घातला. या वेळी तिने स्थानिक पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्याशीही हुज्जत घातली. या वेळी तिने ‘स्वतः कोण आहे ?’ हे सांगत पोलिसांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला.

पोलिसांनी मुलीला एकूण १० सहस्र रुपयांचा दंड भरण्यास सांगितला. या वेळी तिने घरी जाऊ देण्याची विनंती करतांना तिच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. तिच्यासमवेत असणार्‍या मित्राने १० सहस्र रुपयांचा दंड भरला आणि त्यानंतर पोलिसांनी तिला जाऊ दिले.

संपादकीय भूमिका

राजकारणी त्यांच्या मुलांवर काय संस्कार करतात, हेच यातून स्पष्ट होते ! अशांना केवळ दंड आकारून सोडू नये, तर त्यांना कारागृहात टाकावे !