सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधारा पाडण्यात येऊ नये यांसाठी सर्वपक्षीय विरोध !

कृष्णा नदीवरील जुना बंधारा वाचवण्यासाठी एकत्र आलेले सर्वपक्षीय आणि सांगलीकर नागरिक

सांगली, ५ जून (वार्ता.) – कृष्णा नदीवर म्हैशाळ येथे मोठा बंधारा बांधण्यात येणार असून त्यासाठी सांगलीचा बंधारा पाडण्यात येणार आहे. याला सर्वपक्षीय आणि समस्त सांगलीकर नागरिक यांनी विरोध दर्शवत ५ जून या दिवशी सकाळी बंधारा वाचवण्यासाठी मानवी साखळी करत विरोध दर्शवला.

कृष्णा नदीच्या पात्रात सांगलीवाडीजवळ कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे. या बंधार्‍यामुळे सांगलीकरांचा पाणीपुरवठा सुरळीत आहे, तसेच कृष्णा नदीच्या पात्रात सांडपाणी मिसळत नाही. हा बंधारा काढल्यास कृष्णा नदीचे पाणी दूषित होऊन सांगलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, तसेच महापुराच्या काळात पाण्याची पातळी वाढून शेतीची हानी होईल. त्यामुळे सांगलीकरांनी हा बंधारा पाडण्यास विरोध दर्शवला आहे.