पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी खेळाडूंना मैदान सोडण्यास लावणार्‍या ‘आय.ए.एस्.’ दांपत्याचे स्थानांतर !

महसूल विभागाचे प्रधान सचिव संजीव खिरवार यांची लडाखला, तर त्यांची पत्नी रिंकू डग्गू यांची अरुणाचल प्रदेशला बदली

नवी देहली – राजधानी देहलीमध्ये ‘आय.ए.एस्.’ असणार्‍या दांपत्याने पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक यांना मैदान सोडण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. हे समजल्यावर केंद्र सरकारने दोघा ‘आय.ए.एस्.’ अधिकार्‍यांवर कारवाई करत त्यांचे स्थानांतर केले आहे.

देहली प्रशासनातील महसूल विभागाचे प्रधान सचिव संजीव खिरवार यांची लडाखला, तर त्यांची पत्नी रिंकू डग्गू यांची अरुणाचल प्रदेशला बदली करण्यात आली आहे.

‘त्यागराज स्टेडियम’ हे मैदान देहली राज्य सरकारच्या अखत्यारीतील असून ते शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे येथे खेळाडू मोठ्या प्रमाणात सरावासाठी येतात. या मैदानात सायंकाळी ७ वाजल्यानंतर प्रशासकीय अधिकारी खिरवार आणि पत्नी त्यांच्या कुत्र्याला घेऊन फिरायला येत असत. त्यामुळे खेळाडूंना वेळेच्या आधीच म्हणजे सायंकाळी ७ वाजता खेळ आणि सराव बंद करून मैदान सोडण्यास भाग पाडण्यात येत होते. या प्रकारामुळे रोष व्यक्त केला जात होता. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग आली आणि कारवाईची सूत्रे हलली.

संपादकीय भूमिका

प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये ‘ते जनतेचे सेवक नसून मालक आहेत’, अशी उद्दाम मानसिकता रूढ होत असल्याचेच हे उदाहरण !