अवघ्या काही दिवसांत मोसमी पावसाला (मृग नक्षत्राला) प्रारंभ होईल. त्यापूर्वी भात आणि नाचणी यांची रोपवाटिका सिद्ध (तयार) करणे आवश्यक आहे. ती कशा पद्धतीने करायची आणि कोणती काळजी घ्यायची ? यांविषयीचा ऊहापोह या लेखाद्वारे करत आहोत.
१. भाताची रोपवाटिका सिद्ध करतांना घ्यावयाची काळजी !
१ अ. भाजावळ (राब) पद्धत : कोकण विभागात रोपवाटिका क्षेत्राची शेण, कवळ (ऐन, किंजळ इत्यादी झाडांच्या पानासहित लहान फांद्या), गोठ्यामधील मलमूत्र मिश्रित शेण, भाताचा पेंडा, गोठ्यातील इतर टाकाऊ पदार्थ, वाळलेले गवत इत्यादी सेंद्रिय पदार्थांचे थर रचून त्यावर धुसमसत जळण्यासाठी माती पसरून भाजावळ केली जाते. अशा प्रकारची भाजावळ ही प्रामुख्याने भात रोपवाटिकेतील तणनियंत्रणासाठी केली जाते. भाजावळीसाठी कवळ तोडणे, इतर सेंद्रिय पदार्थांची जमवाजमव करणे, वाहतूक करणे आणि रोपवाटिका क्षेत्रावर पसरवणे, हे अत्यंत कष्टाचे काम आहे; म्हणूनच जमीन भाजण्याच्या या प्रक्रियेला ‘राब’ म्हणजेच अपार कष्ट असे संबोधले जाते.
१ आ. भाजावळीचे तोटे
१. यासाठी बरेच मनुष्यबळ लागते. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. तसेच ग्रामीण स्त्रियांना अपार कष्ट करावे लागतात.
२. सेंद्रिय पदार्थ जाळल्यामुळे निसर्गाच्या चक्रात बाधा येते. यासह वनस्पती वाढीसाठी पूर्णान्न म्हणून आवश्यक अन्नद्रव्य पुरवणाऱ्या आणि सेंद्रिय शेतीत सर्वाधिक महत्त्व असणारे शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत इत्यादी सेंद्रिय खतांचा तुटवडा जाणवतो.
३. भात पेंडा आणि गवत जाळल्याने जनावरांच्या खाद्याची उपलब्धता न्यून होते.
४. पर्यावरणाच्या दृष्टीने नैसर्गिक संतुलनाला बाधा येते.
५. काही वेळा वणवे पेटवून फळबाग आणि जंगल यांची अतोनात हानी होते. तसेच वन्य जिवांना हानी पोचू शकते.
६. तणांचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबतोच, असे नाही. भाजावळ व्यवस्थित न झाल्याने, तसेच वारा आणि वहात्या पाण्यासह आजूबाजूच्या क्षेत्रातून येणाऱ्या तणांच्या बियांमुळे भाजावळ केलेल्या क्षेत्रातील तणांचा उपद्रव होतो.
७. भूमीतील उपयुक्त सूक्ष्म जीव-जीवाणूंचा ऱ्हास होतो.
८. धुरामुळे वातावरणातील प्रदूषण वाढते.
९. ही ३ – ४ मास चालणारी वेळखाऊ पद्धत आहे.
१०. कवळ (ऐन, किंजळ इत्यादी झाडांच्या पानासहित लहान फांद्या) तोडतांना काही वेळेस जीवितहानी होण्याची संभावना असते.
१ इ. भाजावळमुक्तीसाठी कृषी विद्यापिठाने शिफारस केलेली भात रोपवाटिका !
१. रोपवाटिकेसाठी सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी भूमी निवडावी.
२. एक हेक्टर (अडीच एकर) लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका सिद्ध करावी लागते.
३. भूमी उभी-आडवी नांगरट करून ढेकळे फोडावीत आणि ती भुसभुशीत करावी.
४. धसकटे आणि काडी-कचरा वेचून घ्यावा.
५. तळाशी १२० सें.मी. आणि पृष्ठभागी ९० सें.मी. रुंदीचे, आठ ते दहा सें.मी. उंचीचे अन् उतारानुसार योग्य लांबीचे गादीवाफे सिद्ध करावेत.
६. गादीवाफ्यावर प्रती गुंठ्याला १०० किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून द्यावे.
७. वाफ्यांना एक गुंठा क्षेत्रासाठी १ किलो यूरिया, ३ किलो ‘सिंगल सुपरफॉस्पेट’ आणि ८५० ग्रॅम ‘म्युरेट ऑफ पोटॅश’ किंवा ३.३३० किलो सुफला (१५:१५:१५) ही रासायनिक खते पेरणी करण्यापूर्वी मातीत मिसळून द्यावी.
८. एक गुंठा क्षेत्रासाठी जाड दाण्याच्या भात जातीचे ६ किलो, बारीक दाण्याच्या जातीचे ४ किलो आणि संकरित वाणाचे (जाती) २ किलो बियाणे वापरावे.
९. एक किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात ‘थायरम’ हे बुरशीनाशक चोळावे.
१०. वाफ्यावर रूंदीस समांतर ओळीमध्ये ७ ते ८ सें.मी. अंतरावर आणि २ ते ३ सें.मी. खोलीवर बियाणे पेरून मातीने झाकून घ्यावे.
११. रोपवाटिकेतील तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी ‘ब्युटाक्लोर ५० ई.सी.’ तणनाशक ५ ते ६ लिटर पाण्यात २० ते ३० मि.ली. या प्रमाणात मिसळून फवारावे. तणनाशक फवारणीसाठी ‘फ्लॅट फॅन नोझल’ वापरावा. फवारणी केलेले क्षेत्र पायाने तुडवले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
१२. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक गुंठा रोपवाटिका क्षेत्रासाठी १ किलो यूरिया खताचा दुसरा हप्ता द्यावा.
१३. खरीप हंगामातील भाताच्या पुनर्लावणीसाठी निवडलेल्या भात जातीचा एकूण कालावधी लक्षात घेऊन कालावधीच्या १/५ (एकपंचमांश) इतक्या वयाची रोपे वापरावीत. (जातीनुसार ३ – ४ आठवड्यांनी रोपे लागणीस सिद्ध होतात.)
टीप १ : एक हेक्टर क्षेत्र भात लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रावर करण्यात येणाऱ्या रोपवाटिकेसाठी करण्यात येणाऱ्या भाजावळीसाठी २.५ ते ३ टन सेंद्रिय पदार्थ जाळले जातात, तसेच ६५ ते ७० शेतमजूर लागतात, तर विद्यापिठाने शिफारस केलेल्या पद्धतीमध्ये १५ ते २० मजूर लागतात. दोन्ही पद्धतीने रोपे वाढवून भात लागवडीपासूनचे पुढील व्यवस्थापन एकसारखे केल्यास भाताची वाढ आणि उत्पादन यांत तफावत येत नाही. त्यामुळे हानीकारक भाजावळ पद्धत बंद करणे उचित ठरेल.
टीप २ : रोप तयार करण्याची वेळ : मोसमी पावसाला प्रारंभ होताच रोपवाटिका तयार करावी. (बियांची पेरणी करावी) |
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रीकल्चर) पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
वाचा उद्याच्या अंकात : भात आणि नागली (नाचणी आणि रागी) यांच्या रोपवाटिकेसाठी शिफारस केलेल्या जाती