‘२२.१.२०२२ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात महर्षींच्या आज्ञेने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे’, यासाठी महामृत्यूंजय याग केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडली आणि गोचर कुंडली यांच्या संदर्भात केलेल्या ‘यू.ए.एस्.’ चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे.
१. महामृत्यूंजय यागाचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सूक्ष्मातून झालेला परिणाम : महामृत्यूंजय यागामध्ये शिवाच्या ‘मृत्यूंजय’ या रूपाला प्रसन्न करण्यासाठी गुळवेलीच्या समिधांची आहुती देऊन महामृत्यूंजय याग करण्यात आला. या यागामध्ये शिवाचे तारक आणि मारक अशी दोन्ही तत्त्वे ५० टक्के प्रमाणात कार्यरत झाली होती. शिवाच्या तारक तत्त्वातून प्रक्षेपित झालेली तारक शक्ती आणि चैतन्य यांच्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये प्राणतत्त्वाचे प्रमाण वाढले. यज्ञात गुळवेलीच्या समिधांची आहुती दिल्यामुळे या समिधांतून प्रक्षेपित झालेल्या अमृततत्त्वाच्या आप, तेज आणि वायु या स्तरांवरील सगुण-निर्गुण स्तराच्या चैतन्याच्या लहरींचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याभोवती सूक्ष्मातून शिवकवच निर्माण झाले. या शिवकवचातील अमृततत्त्वामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्थूल देहात भिनलेली सूक्ष्मतम विषरूपी त्रासदायक काळी शक्ती नष्ट झाली आणि त्यांच्यावरील मृत्यूचे सावट दूर झाले. शिवाच्या मारक तत्त्वातून प्रक्षेपित झालेली ५० टक्के मारक शक्ती आणि चैतन्य यांच्यामुळे दूषित ग्रहांशी सूक्ष्म युद्ध झाले. तेव्हा शिवाच्या ‘मृत्यूंजय महादेव’ या रूपाकडून प्रक्षेपित झालेल्या निर्गुण-सगुण स्तरावरील लयकारी शक्तीचा मारा दूषित ग्रहांवर होऊन त्यांच्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे सूक्ष्म स्तरावर प्रक्षेपित झालेली नकारात्मक ऊर्जा नष्ट केली.
२. महामृत्यूंजय यागानंतर केलेल्या कुंडल्यांच्या ‘यू.ए.एस्.’ परीक्षणातून परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील अशुभ ग्रहांचा परिणाम नाहीसा झाल्याचे दिसून येणे आणि यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील मृत्यूयोग टळल्याचे सिद्ध होणे : महामृत्यूंजय यागाच्या वेळी शिवाच्या ‘मृत्यूंजय महादेव’ या रूपाकडून प्रक्षेपित झालेल्या निर्गुण-सगुण स्तरावरील लयकारी शक्तीने चंद्र, मंगळ आणि शनि तसचे रवि अन् बुध या दूषित ग्रहांतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे सूक्ष्म स्तरावर प्रक्षेपित केलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट केली. त्यामुळे महामृत्यूंजय यागानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अशुभ ग्रहांचा झालेला दुष्परिणाम दूर झाल्यामुळे त्यांच्या अवतारी देहाभोवती काळाच्या स्तरावर निर्माण झालेला महामृत्यूयोग टळला आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याच्या प्रमाणात वृद्धी झाली.
३. यागापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांच्या दोन्ही कुंडल्यांतील प्रत्येकी ३ – ३ ग्रहांची स्पंदने दूषित असल्याने त्यांच्या प्रभावळी आल्या; पण टप्प्या-टप्प्याने त्या प्रभावळी कमी होत जाऊन शेवटी नाहीशा झाल्या. या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या दोन्ही कुंडल्यांतील दूषित ग्रहांच्या अशुभ स्पंदनांच्या संदर्भात सूक्ष्मातून घडलेली प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
३ अ. शिवाच्या मारक तत्त्वातून प्रक्षेपित झालेली ५० टक्के मारक शक्ती आणि चैतन्य यांचा प्रवाह ग्रहलोकातील सूर्यमालिकेतील रवि, चंद्र, मंगळ, बुध आणि शनि या दूषित ग्रहांकडे प्रक्षेपित होऊन त्यांच्याशी सूक्ष्म युद्ध होणे : शिवाच्या मारक तत्त्वातून प्रक्षेपित झालेली ५० टक्के मारक शक्ती आणि चैतन्य यांचा प्रवाह ग्रहलोकातील सूर्यमालिकेतील रवि, चंद्र, मंगळ, बुध आणि शनि या दूषित ग्रहांकडे प्रक्षेपित होऊन त्यांच्याशी सूक्ष्म युद्ध झाले. त्यामुळे शिवाकडून प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीमुळे दूषित ग्रहांतून प्रक्षेपित होणारी नकारात्मक स्पंदने नष्ट झाली आणि शिवाकडून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे या ग्रहांतील सकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात कार्यरत झाली. त्यामुळे या ग्रहदशांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुंडलित निर्माण झालेला ‘महामृत्यूचा अशुभ योग’ दूर होऊन रविग्रह परात्पर गुरु डॉ. आठवले यांना १० टक्के अनुकूल झाला. त्यामुळे यज्ञ चालू असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पडलेली मृत्यूची सावली त्यांच्यापासून काही कि.मी. दूर गेली आणि यज्ञाच्या समाप्तीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सूर्यनाडी चालू झाल्यामुळे त्यांच्याकडनू प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीच्या प्रवाहामुळे ही सावली पूर्णपणे विरून गेली. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आलेले मोठे गंडांतर टळले. यज्ञामुळे दूषित ग्रहांपैकी शनिग्रहाचा प्रकोप न्यून होऊन रवि ग्रहाची अनुकूलता वाढल्यामुळे यज्ञानंतर काही दिवसांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यात १० – १५ टक्के सुधारणा होऊ शकते. त्यासाठी त्यांच्या कुंडलीतील रविबळ वाढणे आवश्यक आहे. जर त्यांचे रविबळ वाढले, तर धाप लागणे, प्राणशक्ती न्यून असणे, तोंडाला कोरड पडणे इत्यादी शारीरिक स्तरावर होणारे त्रास ३० टक्के इतक्या प्रमाणात न्यून होऊ शकतात. (‘मला प्रतिदिन सकाळी मालीश करतात. पावसाळा संपल्यानंतर मला मालीश करतात, तेव्हा सूर्यदेवाचे दर्शन होते. तेव्हा मी त्याला नमस्कार करून सूर्यस्नान करतो आणि अधूनमधून सूर्यत्राटकही करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)
३ आ. महामृत्यूंजययाग सुरू असतांना शिवाच्या महामृत्यूंजय रूपाकडून प्रक्षेपित झालेली मारक शक्ती आणि चैतन्य यांचा परात्पर गुरुदेवांच्या कुंडलीमध्ये असणाऱ्या अशुभ ग्रहांवर झालेला परिणाम
टीप १ – रवि किंवा सूर्य हा ग्रह सृष्टीतील समस्त जिवांना सात्त्विक ऊर्जा आणि प्राणशक्ती देणारा ग्रहदेव आहे. त्यामुळे सूर्याच्या कृपेमुळे विविध जिवांना चांगले आरोग्य प्राप्त होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील मृत्यूची अवकळा दूर होऊन त्यांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी यज्ञापूर्वी संकल्प केला होता. त्यामुळे शिवाच्या ‘मृत्यूंजय’ या रूपाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केल्यावर शिवाच्या ‘मृत्यूंजय’ या रूपाकडून प्रक्षेपित झालेली मारक शक्ती आणि चैतन्य यांचा परिणाम सूर्यग्रहावर २० टक्के इतका झाला. सोम, मंगळ आणि बुध हे ग्रह व्यक्तीच्या आरोग्याशी अल्प प्रमाणात संबंधित असल्यामुळे मृत्यूंजययज्ञातून प्रक्षेपित झालेली शिवाची मारक शक्ती आणि चैतन्य यांचा परिणाम रविग्रहाच्या तुलनेत सोम, मंगळ आणि बुध या ग्रहांवर अल्प प्रमाणात, म्हणजे केवळ १० टक्के इतकाच झाला.
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट प्रामुख्याने ‘शनि’ या ग्रहामुळे आलेले आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट दूर करण्यासाठी शिवाच्या ‘मृत्यूंजय’ या रूपाकडून प्रक्षेपित झालेली मारक शक्ती आणि चैतन्य यांचा परिणाम शनिग्रहावर सर्वाधिक म्हणजे ५० टक्के इतका झाला. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे १ संकट संपलेले आहे. ’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१.२०२२)
|