डान्समुळे (नृत्यामुळे) मानसिक आरोग्य रहाते उत्तम !

जर तुम्ही जास्त वजन उचलत नसाल आणि जास्त व्यायाम करत नसाल, तर डान्स (नृत्य) हा सर्वोत्तम आणि चांगला व्यायाम आहे. शारीरिकदृष्ट्या उपयुक्त असण्यासह मानसिक आरोग्यासाठी नृत्याचे अनेक लाभ आहेत. नृत्य केल्याने लगेच मनस्थिती (मूड) सुधारते आणि ही एक उत्तम आरामदायी क्रियाशीलता (ॲक्टिव्हिटी) आहे.

नृत्य हृदय गतीसाठी संतुलित व्यायाम प्रकार असणे आणि त्यामुळे कार्यक्षमता चांगली रहाणे

तुम्ही अनेकांना असे म्हणतांना ऐकले असेल की, नृत्य हा ‘कार्डिओ वर्कआऊट’चा (हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठीचा) एक उत्तम प्रकार आहे, हे व्यर्थ सांगितलेले नाही. नियमितपणे नृत्य केल्याने हृदय गती संतुलित होते आणि ‘कोलेस्ट्रॉल’ही न्यून होते. असे मानले जाते की, जे लोक आठवड्यातून ३ ते ४ वेळा अर्ध्या घंट्यापेक्षा जास्त काळ नृत्य करतात, त्यांची कार्यक्षमता (स्टॅमिना) आणि श्वासोच्छ्वास चांगला असतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले रहाते. नृत्यामध्ये जड हालचालींचा समावेश होतो आणि त्यामुळे घाम येतो, ज्यामुळे वजन न्यून होते.

नृत्यामुळे तणाव न्यून होणे

जर तुम्ही तणावग्रस्त असाल, तर तुम्ही तुमचे आवडते संगीत लावून त्यावर नृत्य करा. हे तुम्हाला आराम करण्यास साहाय्य करील, तुम्हाला तणावातून थोडा आराम मिळेल आणि काही काळासाठी तुमचा ताण विसरून जाल.

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)