पुण्यातील दगडूशेठ गणपतीची मूर्ती आता सियाचीन सीमेवर विराजमान !

सियाचीनमध्ये उभारलेल्या सर्वधर्मस्थळामध्ये पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार !

पुणे – भारतीय सैन्यातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांनी सियाचीनमध्ये उभारलेल्या सर्वधर्मस्थळामध्ये पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘दगडूशेठ हलवाई ट्रस्ट’च्या वतीने २ फूट उंच श्री गणेशमूर्ती मुख्य मंदिरामध्ये बटालियनचे सैनिक माऊली रेडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, विजय धनगर यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी ट्रस्टचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते.

सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येत नाही. त्यामुळे २२ मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सर्वधर्म स्थळावर करण्याची इच्छा ट्रस्टकडे केली होती. ट्रस्टने विनंती मान्य करीत पुण्यातील मूर्तीकार भालचंद्र देशमुख यांनी साकारलेली मूर्ती बटालियनच्या स्वाधीन केली.