बांदा, ११ एप्रिल (वार्ता.) – प.पू. दास महाराज, पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक आणि सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु सत्यवान कदम या संतत्रयींच्या उपस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील पानवळ (डेगवे), बांदा येथील श्रीराम पंचायतन मंदिरात श्रीरामनवमी उत्सव अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यानिमित्त सकाळी नित्यपूजा, अभिषेक झाले. त्यानंतर तळकट (तालुका दोडामार्ग) येथील संगीत विद्यालयाचे मुख्य श्री. श्रीकांत देसाई यांनी शास्त्रीय तबलावादन केले. या वेळी त्यांच्या शिष्यवर्गाने त्यांना गायन आणि वादन यांसाठी साथ दिली. आंदुर्ले, कुडाळ येथील ह.भ.प. सदाशिव पाटील यांचे श्रीरामजन्मावरील कीर्तन झाले. त्यांना श्री. उदय ओगले यांनी तबल्यावर, तर
श्री. दीपक पेंडसे यांनी संवादिनीवर साथ केली. दुपारी १२ वाजता श्रीरामजन्म सोहळा पार पडला. या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन (भाई) डेगवेकर यांनी यजमानपद भूषवले. प.पू. दास महाराज, पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक आणि सद्गुरु सत्यवान कदम या संतत्रयींनी श्रीरामाच्या पाळण्याला झोका दिला.
यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत सामूहिक प्रार्थना करण्यात आली. कीर्तनकार पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्यांचा सत्कार सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते करण्यात आला. सकाळच्या सत्राच्या शेवटी प.पू. दास महाराज यांनी श्रीरामरायांच्या चरणी रामराज्याच्या स्थापनेसाठी गाऱ्हाणे घातले.
दुपारच्या सत्रात पर्वरी येथील प.पू. भक्तराज महाराज प्रासादिक भजन मंडळाचा भजनांचा कार्यक्रम, डोंबिवली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा शास्त्रीय भजनांचा कार्यक्रम, सामूहिक रामरक्षा आणि रामनामाचा जप, असे कार्यक्रम झाले. सायंकाळच्या सत्रात श्री. शेखर पणशीकर यांनी ‘गीतरामायण’ सादर केले, तर रात्री स्थानिकांची भजने झाली.
वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. प.पू. दास महाराज यांचे कराड येथील भक्त श्री. श्रीनिवास शिवराम देसाई यांनी महाप्रसाद अर्पण केला.
२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. रमेश दळवी आणि श्री. वीरेंद्र आठलेकर यांनी उपस्थित राहून सेवेतही सहभाग घेतला.
३. श्री. रमेश दळवी हे भगवी धर्मपताका हातात घेऊन खास संघाच्या पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. त्यांनी रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीची प्रार्थना मागून घेतली.
क्षणचित्रे
१. या वेळी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन अन् वितरण कक्ष उभारण्यात आला होता.
२. उत्सवाला बांदा, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आदी भागांतून, तसेच गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील सामूहिक प्रार्थनेच्या उपक्रमाला प्रारंभ !
बांदा – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी भारतभरातील सर्व मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थनेचा उपक्रम आरंभ करण्यात आला आहे. या अंतर्गत रामनवमीनिमित्त गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील उपक्रमाचा प्रारंभ पानवळ येथील श्रीराम पंचायतन मंदिरात सामूहिक प्रार्थना करून करण्यात आला.
सामूहिक प्रार्थनेतील सूत्रे
१. भारतासह पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन होऊदे !
२. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्याला साहाय्य करणाऱ्या सर्व हिंदु धर्मप्रेमींचे रक्षण व्हावे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जगभरात कार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांचे आयुरारोग्य उत्तम राहून त्यांच्या कार्यात उत्तरोत्तर वृद्धी होऊदे. त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊदे !
३. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे ज्ञात-अज्ञात संत, ऋषिमुनी यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम राहूदे.
४. हिंदु धर्माच्या प्रचाराच्या कार्यात बाधा निर्माण करणारे, हिंदु धर्मावर आघात करणारे, हिंदु धर्माचा अपप्रचार करणाऱ्या हिंदु धर्मविरोधकांची शक्ती क्षीण होऊन हिंदु धर्माच्या विरोधातील त्यांचे सर्व प्रयत्न निष्प्रभ होऊ देत !
५. जगभरात निर्माण झालेल्या जागतिक अशांततेत आणि युद्धजन्य स्थितीत जगभरातील भक्तांचे रक्षण होऊदे आणि जगभरात सात्त्विक लोकांचे अर्थात ईश्वरी राज्य (हिंदु राष्ट्र) निर्माण होण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण होऊदे !
हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. संदेश गावडे यांनी ही प्रार्थना सांगितली आणि त्यामागील उद्देशही स्पष्ट केला.