बालसत्संगातील दैवी बालक आणि युवा साधक यांनी पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) अन् पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) या बालसंतांमधील अनुभवलेली सहजता, आनंद आणि चैतन्य !

९.१२.२०२१ ते ११.१२.२०२१ या कालावधीत झालेल्या बालसत्संगात पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) आणि पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) हे बालसंत उपस्थित होते. या सत्संगात उपस्थित बाल आणि युवा साधक यांना पू. भार्गवराम प्रभु अन् पू. वामन राजंदेकर या बालसंतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.


पू. भार्गवराम प्रभु अन् पू. वामन राजंदेकर यांची स्मित हास्य करणारी एक मुद्रा !

१. कु. सृष्टी सूर्यवंशी (वय १८ वर्षे), ठाणे

१ अ. पू. वामन राजंदेकर यांच्याविषयी जाणवलेले सूत्र : ‘पू. वामन हातांच्या वेगवेगळ्या मुद्रा करत होते आणि छाती पुढे काढून बसले होते. तेव्हा ‘जणू ते सूक्ष्मातून वाईट शक्तींशी युद्ध करत आहेत’, असे मला वाटत होते.

१ आ. अनुभूती

१. माझ्यावर आलेले त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण दूर होण्यासाठी मी बालसंतांना प्रार्थना केल्यावर मला जांभया येऊ लागल्या.

२. मला पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर यांच्याभोवती पिवळा प्रकाश दिसत होता.

२. कु. अनुराग राऊत, फोंडा, गोवा.

२ अ. अनुभूती

२ अ १. बालसंत सत्संगात येण्यापूर्वी मन अस्थिर असणे : ‘सत्संग घेणारी दैवी बालिका कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) भावप्रयोग घेत होती. तेव्हा माझे मन अस्थिर होऊन माझ्या मनात विचार चालू होते.

२ अ २. अकस्मात् ‘काही तरी झाले आणि मन अस्तित्वहीन अन् निर्विचार झाले’, असे जाणवणे : माझे डोळे मिटलेले असतांना अकस्मात् मला आजूबाजूने पिवळा प्रकाश दिसू लागला. काही क्षणांपूर्वी माझ्या मनात येणारे विचार बंद होऊन माझे मन एकाग्र झाले. तेव्हा मला असे जाणवले की, ‘मनात काहीतरी चालू होते. ते अकस्मात् अस्तित्वहीन आणि निर्विचार झाले.’

२ अ ३. वातावरण सकारात्मक आणि शांत जाणवणे : अपालाताईने बालसाधकांना कृतज्ञता व्यक्त करायला सांगितली. मी डोळे उघडल्यावर सत्संगात पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर हे बालसंत आले होते. त्यांच्या येण्याने ‘वातावरणात सकारात्मकता आणि शांतता वाढली आहे’, असे मला जाणवले.’

३. कु. सानिका सोनीकर (आध्यात्मिक पातळी ५१ टक्के, वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ अ. पू. भार्गवराम यांची अंतर्मुखता : ‘बालसत्संग संपल्यावर बालसाधक पू. भार्गवराम यांच्याशी बोलायला येतात; पण पू. भार्गवराम शांत आणि स्थिर असतात. त्या वेळी ते कुणाशीही बोलत नाहीत. मी त्यांच्या वडिलांना याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘सत्संग झाल्यावर पू. भार्गवराम अंतर्मुख होतात. त्यामुळे सत्संग झाल्यावर ते कुणालाही लवकर प्रतिसाद देत नाहीत.’’

३ आ. ‘चुकांची खंत कशी असायला हवी ?’, याची जाणीव होणे : बालसत्संगात चुकांचा आढावा चालू असतांना पू. भार्गवराम त्यांच्या वडिलांना म्हणाले, ‘‘अशा चुका होत असतील, तर आपण देवापासून दूर जाऊ ना !’’ तेव्हा मला ‘माझ्यामध्ये चुकांविषयी किती खंत आहे ? आणि प्रत्यक्षात किती असायला हवी ?’, याची जाणीव झाली.’

४. कु. आदित्य राऊत (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय १२ वर्षे), फोंडा, गोवा.

पू. वामन राजंदेकर

४ अ. पू. वामन यांच्यामध्ये चैतन्य जाणवणे : ‘पू. वामन बाळकृष्णच आहेत. ‘ते आपल्याला मार्ग दाखवणार आहेत’, असे मला वाटले. ते हसत असतांना मला त्यांच्या तोंडवळ्यावर चैतन्य दिसते.’

५. कु. चैत्राली प्रसाद कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पू. भार्गवराम भरत प्रभु

५ अ. पू. भार्गवराम प्रभु

५ अ १. चूक सांगून क्षमायाचना करणे : ‘पू. भार्गवराम दैवी बालसाधकांच्या सत्संगात आल्यावर त्यांनी ‘एका सत्संगात मी आसंदी वाजवून आवाज केला’, अशी चूक सांगून गुरुचरणी क्षमायाचना केली. तेव्हा ‘ते किती सहजभावात रहातात आणि त्यांच्यामध्ये मुळातच अहं नाही’, असे वाटून माझी भावजागृती झाली अन् मलाही त्यांच्यासारखे ‘सहज वागायचे आहे’, याची जाणीव झाली.

५ अ २. श्री गुरूंप्रती असलेला भाव : सत्संग संपल्यानंतर आम्ही सद्गुरूंचा श्लोक म्हटला नाही; पण पू. भार्गवराम यांनी लगेच हात जोडून ‘ज्या ज्या ठिकाणी ..’ हा श्लोक म्हटल्यावर आम्हाला आठवण झाली.

५ अ ३. बाळकृष्णाचे रूप दिसणे : पू. भार्गवराम यांच्यामध्ये मला बाळकृष्ण दिसतो. ‘ते बाळकृष्णासारखेच खेळतात आणि बोलतात’, असे मला वाटले.

५ आ. पू. वामन राजंदेकर

५ आ १. आज्ञापालन आणि सहजता : पू. वामन यांना त्यांचे आई-वडील आणि बहीण जे सांगतात, तसे ते त्वरित करतात. यातून मला त्यांच्यातील आज्ञापालन (परेच्छेने वागणे) आणि सहजता या गुणांचे दर्शन झाले.

५ आ २. नम्रता आणि प्रेमभाव : पू. वामन बोलत असतांना मी त्यांचे बोलणे ऐकण्यात तल्लीन होऊन जाते. त्यांच्या बोलण्यात पुष्कळ नम्रता आणि प्रेमभाव आहे.

५ आ ३. ध्यानावस्थेत आणि शिवदशेत असणे : पू. वामन यांचे रूप अत्यंत तेजस्वी आणि मनोहर आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘ते ध्यानावस्थेत आणि शिवदशेत आहेत’, असे वाटते.’

६. कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६ अ. पू. भार्गवराम प्रभु

६ अ १. सतत आनंदी रहाणे : ‘पू. भार्गवराम यांना कधीही पाहिले, तरी ते आनंदीच दिसतात.

६ अ २. प्रेमभाव : एकदा मला थोडा ठसका लागला होता. तेव्हा पू. भार्गवराम तेथेच होते. त्यांनी लगेच मला विचारले, ‘‘तुम्हाला पाणी हवे आहे का ?’’

६ आ. पू. वामन राजंदेकर

६ आ १. स्थिरता : स्थिरता हा पू. वामन यांचा स्थायीभाव आहे.

६ आ २. शिकण्याची वृत्ती : पू. वामन प्रत्येक कृती समजून घेऊन करतात.

६ आ ३. विचारून घेण्याची वृत्ती : एकदा पू. वामन यांना एक खेळ खेळायचा होता. तेव्हा त्यांनी आईला विचारले, ‘मी आता खेळू का ?’

६ आ ४. इतरांना साहाय्य करणे : एकदा माझी ‘बॅग’ सापडत नव्हती. तेव्हा पू. वामन यांनी मला विचारले, ‘‘तुझी ‘बॅग’ सापडत नाही का ?’’ लगेच त्यांनी मला ‘बॅग’ शोधायला साहाय्य केले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ११.१२.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक