सातारा येथील जिहे-कठापूर योजनेसाठी केंद्र सरकारकडून २४७ कोटी रुपये !

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना जलपूजनाचे निमंत्रण

सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – जिहे-कठापूर योजनेचा प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेमध्ये समावेश करून योजनेसाठी केंद्र सरकारने २४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी मार्गांचे काम मार्गी लावल्याविषयी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. तसेच जिहे-कठापूरच्या योजनेच्या जलपूजनासाठी निमंत्रणही दिले आहे.

आमदार गोरे आणि खासदार निंबाळकर यांनी १ फेब्रुवारी या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेऊन लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या रखडलेल्या कामांविषयी सादरीकरण केले होते. ही योजना माण-खटाव तालुक्यांसाठी संजीवनी ठरणार असल्याने उर्वरित कामे त्वरित पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘जिहे-कठापूर योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करण्यात यावा’, अशी विनंती दोघांनी पंतप्रधानांकडे केली होती. मोदी यांनी याची तात्काळ नोंद घेत जलशक्ती मंत्रालयाला आदेश देऊन केंद्राकडून निधी देण्याच्या सूचना दिल्या. पंतप्रधानांच्या आदेशानंतर त्वरित हालचाली होऊन त्यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावे असलेल्या जिहे-कठापूर योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करण्यात आला. तसेच २४७ कोटी रुपयांचा निधीही जाहीर करण्यात आला. त्यातील ६ कोटी रुपये वर्गही करण्यात आले.