संपादकीय
राष्ट्रप्रमुखाचा एखादा निर्णय जरी चुकला, तरी त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतात !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की हे रशियाने छेडलेल्या युद्धाच्या साहाय्यासाठी जगाकडे याचना करत आहेत, तसेच ते युक्रेनच्या नागरिकांना या युद्धात सहभागी होऊन प्राणपणाने लढण्यासाठी भावनिक आवाहनही करत आहेत. रशियाचे आव्हान परतवून लावण्यासाठी झेलेंस्की स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. या युद्धामुळे युक्रेनच्या सामान्य जनतेची झालेली हेळसांड पाहून कुणाचेही मन अस्वस्थ होईल. ‘युक्रेनवर ही स्थिती का ओढवली ?’, ‘रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामध्ये कोण योग्य आणि कोण अयोग्य ?’, ‘यामध्ये भारताने कोणती भूमिका घेतली पाहिजे ?’ यांविषयी बरेच चर्वितचर्वण होत आहे. ‘युक्रेनने आतापर्यंत भारताला कधीच पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे या युद्धात भारताने पडायचे नाही’, असेही सांगितले जात आहे. युक्रेनचे भविष्य काय आहे ? हे नियतीच ठरवेल. राष्ट्रासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारा, मुत्सद्दी आणि मुख्य म्हणजे आपले मित्र अन् शत्रू कोण ? याची उत्तम जाण असणार्या नेत्याच्या हाती राष्ट्र सोपवणे का आवश्यक असते, हे अधोरेखित झाले. झेलेंस्की यांनी ज्यांना मित्र म्हटले, त्यांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे झेलेंस्की यांनी ‘जगाने आम्हाला वार्यावर सोडले’, असे म्हणत रोष व्यक्त केला. त्यामुळे युक्रेनला सध्या तरी कुणी वाली नाही, असेच म्हणावे लागेल.
दूरदृष्टीचा अभाव !
देशाचे नेतृत्व करणार्या नेत्याचा एखादा निर्णय जरी चुकला, तरी त्याचे परिणाम पूर्ण देशाला भोगावे लागतात. युक्रेन याचे उत्तम उदाहरण आहे. वर्ष १९९१ च्या सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर युक्रेन स्वतंत्र झाला. त्या वेळी घेतलेल्या सर्वेक्षणात ९१ टक्के लोकांनी युक्रेन स्वतंत्र देश हवा, असे मत नोंदवल्याचे सांगण्यात येते. युक्रेनमधील काही रशियन भाषा बोलणारे मात्र रशियाच्या बाजूने नेहमीच उभे राहिले. अलीकडच्या काळात मात्र युक्रेनची युरोपीय देशांशी सलगी वाढली होती. त्यामुळे अमेरिका आणि युरोपीय देश यांच्या सांगण्यावरून युक्रेन ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) देशांचा सदस्य होण्याची स्वप्ने पाहू लागला. हे स्वप्न त्याला महागात पडले.
‘नाटो’ ही रशियाविरोधी जागतिक संघटना आहे. रशियाधार्जिणे नेतृत्व युक्रेनच्या सत्तेत कसे राहील, हे रशियाने पाहिले; मात्र मागील काही वर्षांत युक्रेनमध्ये रशियाविरोधी वारे वाहू लागले. रशियाचे स्वामित्व झुगारण्याचा युक्रेनकडून प्रयत्न होऊ लागला आणि हे पुतिन यांना खुपले. ‘नाटो देशांचे सैन्य युक्रेनमध्ये येऊन ठेपल्यास रशियाला धोका उद्भवू शकतो’, हे जाणल्यामुळे रशियाने दादागिरी दाखवण्यास आरंभ केला. ‘रशियाचे स्वामित्व झुगारण्यास नाटो देश आणि अमेरिका साहाय्य करतील’, या भ्रमात झेलेंस्की राहिले अन् ते युक्रेनसाठी घातक ठरले. याउलट रशिया निर्धास्त होता; कारण ‘नाटो देश किंवा अमेरिका केवळ बडबड करतात; मात्र कृती काही करत नाहीत’, हे त्याने जाणले होते. त्यामुळे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. पुतिन हे मुरलेले राजकारणी, त्यात माजी गुप्तचर अधिकारी. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील छक्के-पंजे त्यांना चांगलेच ठाऊक होते. यामध्ये त्यांची खेळी यशस्वी ठरली, तर युक्रेनची नाटोच्या सदस्यत्वासाठी अमेरिका आणि अन्य युरोपीय देश यांच्यावर अवलंबून रहाण्याची खेळी चुकली. त्याची किंमत युक्रेन आज भोगत आहे.
भारताच्या दृष्टीकोनातून युद्ध !
रशियाच्या दृष्टीने पहाता युक्रेन तसा सर्वच गोष्टींमध्ये लहान देश आहे. त्यामुळे त्याच्यावर आक्रमण करून त्याला कह्यात घेऊन रशियाने काही भीम पराक्रम केला, असे समजू नये. येथे सूत्र असे आहे की, युक्रेनसारख्या छोट्या देशांनी मोठ्या देशांशी कसा सामना करायचा ? तिबेट हाही तसा छोटासा देश. चीनने त्याला घशात घातले, तसेच तैवानवर त्याचा डोळा आहे. या देशांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण कोण करणार ? युद्धात नैतिक किंवा अनैतिक असे काहीच नसते. मोठ्या देशांच्या स्वार्थी आणि युद्धखोर वृत्तीमुळे अनेक लहान अन् दुर्बळ देशांना मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे राष्ट्र टिकवायचे असल्यास युद्धसज्जता आणि सर्वच क्षेत्रांत स्वयंपूर्णता असणे आवश्यक असते. ते शक्य होत नसल्यास मुत्सद्दीपणे मोठ्या देशांना हाताळणे आवश्यक असते.
५ डिसेंबर १९९४ मध्ये रशिया, ब्रिटन, अमेरिका, कझाकिस्तान, युक्रेन आणि बेलारूस यांनी ‘बुडापेस्ट मेमोरेंडम’वर स्वाक्षरी केली. याच करारात कझाकिस्तान, बेलारूस आणि युक्रेन या तिन्ही देशांना त्यांच्याकडील आण्विक शस्त्रे निकामी करण्याचे सांगण्यात आले. त्या वेळी युक्रेन तिसरा आण्विक शस्त्रधारी देश होता; मात्र अमेरिका आणि ब्रिटन यांच्यावर आंधळा विश्वास ठेवून त्याने ती शस्त्रे निकामी करण्याचा राष्ट्रघातकी निर्णय घेतला. आज युक्रेन जर अण्वस्त्रधारी देश असता, तर त्याच्यावर ही परिस्थिती ओढवली असती का ?
भारताचे मोठेपण !
प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केल्यावर श्रीलंकेचे राज्य रावणाचा भाऊ बिभिषणाकडे सोपवून ते अयोध्येला निघून गेले. प्रभु श्रीरामचंद्रांनी लढलेले ते नैतिक युद्ध होते. हीच शिकवण भारताला असल्यामुळे भारताने नेहमीच श्रीलंका, भूतान, नेपाळ आदी देशांचे सावभौमत्व जपले. त्यांना साहाय्य करण्याच्या भूमिकेत तो राहिला. त्यात नेपाळ आणि श्रीलंका यांनी चीनशी मैत्री करून भारताचा विश्वासघात केला, हा प्रश्न वेगळाच आहे. त्यामुळेच वरील सर्वच सूत्रे अभ्यासता भारत स्वयंपूर्ण आणि युद्धसज्ज झाल्यास तिसर्या महायुद्धात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो; मात्र त्यासाठी आतापासून सिद्धता हवी !