कराड नगरपालिकेतील थकबाकीदारांची नावे सार्वजनिक ठिकाणी झळकणार !

कराड नगरपालिका

कराड, १३ जानेवारी (वार्ता.) – कराड नगरपालिकेने शासकीय कार्यालयांसह शहरातील कर वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आता शहरातील थकबाकीदारांची नावे फलकावर लिहून ते फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. शासकीय कर वसुलीचीही पालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

रमाकांत डाके पुढे म्हणाले की, कराड नगरपालिकेने आतापर्यंत ५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. अद्याप १४ कोटी रुपयांची थकीत कर रक्कम वसूल होणे शेष आहे. त्यामध्ये शासकीय कार्यालयांची अनुमाने सव्वा कोटी रुपये वसुली थकीत आहे. त्यासाठी शहराचे ४ भाग करून ५ पथके निर्माण करण्यात आली आहेत. शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांकडे ५ वर्षांपासून कर रक्कम थकीत आहे, तसेच शहरातील नागरिकांकडून पाणीपट्टी आणि घरपट्टी थकीत आहे.