अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपिठावर एकही मराठी शब्‍द न उच्‍चारता केले ‘प्रमुख पाहुणे’ म्‍हणून भाषण !

नाशिक, ४ डिसेंबर (वार्ता.) – पाच दशकांहून अधिक काळ मुंबईत राहिलेल्‍या जावेद अख्‍तर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपिठावर ‘प्रमुख पाहुणे’ म्‍हणून बोलतांना संपूर्ण भाषणात एकही मराठी शब्‍द उच्‍चारला नाही. विशेष म्‍हणजे त्‍यांना संमेलनाला प्रमुख पाहुणे म्‍हणून निमंत्रित करण्‍यात आले याविषयी त्‍यांच्‍या भाषणाला प्रारंभी त्‍यांनी इंग्रजीमध्‍ये ‘थँक्‍यू’ म्‍हणून आयोजकांचे आभार मानले.

जावेद अख्‍तर यांनी त्‍यांच्‍या भाषणात त्‍यांनी मराठी भाषेची थोरवी सांगितली; मात्र त्‍याच मराठीचा गौरव करण्‍यासाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या संमेलनात त्‍यांनी मराठीचा असा उपमर्द का केला ? या प्रश्‍न उपस्‍थित साहित्‍यप्रेमींना पडला. विशेष म्‍हणजे जावेद अख्‍तर यांनी त्‍यांच्‍या भाषणात मराठीचे साहित्‍य समजून घेतल्‍याचा संदर्भही बोलून दाखवला; मात्र मराठी बोलता येत असूनही मराठी भाषेचा गौरव करण्‍यात असलेल्‍या व्‍यासपिठावर मराठी भाषेत ते एक वाक्‍यही बोलले मात्र नाहीत, याविषयी उपस्‍थित साहित्‍यप्रेमींनी असंतोष व्‍यक्‍त केला. इतकी वर्षे मराठीभूमीत आणि मराठी भाषकांमध्‍ये राहून एकही मराठी शब्‍द न बोलणार्‍या व्‍यक्‍तीला मराठी साहित्‍य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलावून आयोजकांनी नेमके काय साध्‍य केले ? असा प्रश्‍नही काही साहित्‍यप्रेमींनी व्‍यक्‍त केला.

साहित्य संमेलनात बोलतांना जावेद अख्तर

अख्‍तर यांनी या वेळी मुक्‍ताबाई आणि नंतरच्‍या काळातील बहिणाबाई (तुकाराम महाराजांची शिष्‍या) यांचा मराठीतील जुन्‍या कवयित्री म्‍हणून उल्लेख केला. विदेशात २०० वर्षांपूर्वीही स्‍त्री लेखिका या पुरुषांच्‍या नावाने लिहीत आणि आपल्‍याकडे ही ७०० वर्षांपूर्वीची स्‍त्री लेखिकांची परंपरा आहे, असे ते या वेळी म्‍हणाले. (ही तुलना अख्‍तर यांनी हे ‘हिंदु धर्मात स्‍त्रियांवर अन्‍याय होत होता’, अशी गरळओक करणारे समस्‍त पुरोगामी आणि विद्रोही यांनाही सांगावी ! – संपादक)

जरी राजकारणात रस नसला तरी त्‍यापासून साहित्‍यिक त्‍यांना वेगळे ठेवू शकत नाहीत. त्‍याचप्रमाणे साहित्‍यिकांनी कुठल्‍या राजकारणाच्‍या प्रभावाखाली न येता लेखन केले पाहिजे, असेही ते या वेळी म्‍हणाले. ‘लेखक सामान्‍यांना जागरूक करतात, तेव्‍हा समाजातील काहींना ही गोष्‍ट रुचत नाही. त्‍यांना देशद्रोही समजले जाते’, असा टोमणा अख्‍तर यांनी या वेळी मारला. (अशा प्रकारे अप्रत्‍यक्ष भाष्‍य करून आणि साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपिठावरून टोमणे मारून अख्‍तर इतरांचे अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य डावलत नाहीत काय ? – संपादक)

सौजन्य : ABP माझा

अख्‍तर या वेळी असेही म्‍हणाले की, ८०० वर्षांपूर्वी मराठी भाषेत मुक्‍ताबाई झाली; पण भारतीय भाषांमध्‍ये त्‍यापूर्वी भारतात कोणी माहिती असलेली कवियत्री होती, असे नाही. (अख्‍तर यांचे अज्ञान ! भारतात सहस्रो वर्षांपूर्वीपासून संस्‍कृत भाषेत अमाप साहित्‍य लिहिले गेले आणि त्‍यापूर्वी ते मुखोद़्‍गत होते. गार्गी, मैत्रयी यांसारख्‍या विदुषी भारतात होऊन गेल्‍या. वेदांवरील भाष्‍य लिहिण्‍यात त्‍यांचे योगदान होते. संस्‍कृत ही पद्य भाषा असल्‍याने लिखाण पद्यातच होते. भारतातील सामान्‍य स्‍त्रियाही जात्‍यावर बसल्‍यावर ओव्‍या म्‍हणत त्‍या त्‍यांनीच शब्‍दबद्ध केलेल्‍या असत. – संपादक)