मराठी भाषेला लोकमान्यता असल्याचे दाखवून द्या ! – सुभाष देसाई, मराठी भाषामंत्री

संस्कृत खालोखाल सात्त्विक असणार्‍या मराठी भाषेला अभिजात दर्जा नसणे दुर्दैवी ! – संपादक 

नाशिक, ३ डिसेंबर (वार्ता.) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयीची सर्व कागदपत्रे केंद्रशासनाकडे पाठवण्यात आली असून केंद्रीय भाषा तज्ञ समितीने कागदपत्रे स्वीकारली आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आहे, असे या समितीने मान्य केले आहे; मात्र अद्यापही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. केंद्रशासनाकडे पुराव्यानिशी सर्व कागदपत्रे देऊनही हा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे मराठीला आता राज्यमान्यता कधी मिळेल तेव्हा मिळेल, मात्र मराठी ‘लोकमान्य’ आहे, हे दाखवून देण्यासाठी महामहीम राष्ट्रपतींना पत्र लिहा, असे आवाहन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केले.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘अभिजात मराठी दालन’ या कार्यक्रमात देसाई यांनी वरील विधान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुभाष देसाई यांच्या हस्ते फीत कापून केले. (‘फीत कापणे’ ही पाश्चात्त्य पद्धत आहे. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. भारतीय संस्कृतीनुसार कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करतात. त्याला शास्त्राधार आहे. भाषा ही संस्कृतीला उजागर करत असते. त्यामुळे साहित्य संमेलनात भारतीय संस्कृतीचेही महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार आचरण करणे उचित ठरेल ! – संपादक) या कार्यक्रमाला संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अभ्यास समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण

१. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रश्न न्यायालयात नेण्यात आला असून न्यायालयाने मराठी भाषा अभिजात असल्याचे मान्य केल्याची लेखक श्रीरंग गोडबोले यांनी सिद्ध केलेली एक प्रभावी ध्वनीचित्रफीत या वेळी दाखवण्यात आली.

२. कार्यक्रमाच्या मंडपात मराठी भाषेचे एक दालन सिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये मराठी भाषा प्राचीन असल्याचे प्रातिनिधिक पुरावे ठेवण्यात आले होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचा अभिनव उपक्रम !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोस्टकार्डवरील पत्र सिद्ध करून ठेवण्यात आली होती. त्यावर स्वाक्षरी करून मराठीप्रेमींनी ती पोस्टाच्या पेटीत टाकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याचे आवाहन करण्यासाठी या ठिकाणी ‘क्यू आर कोड’ ठेवून त्यावर ‘लॉग इन’ करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मराठी भाषेची होणारी गळचेपी आणि हेळसांड थांबवायला हवी !

छगन भुजबळ यांचे स्‍वागताध्‍यक्षीय मनोगत

मराठी भाषेची होणारी गळचेपी आणि हेळसांड आपण थांबवायला हवी. भाषा हे संवादाचे माध्‍यम असते, तसेच भाषा ही संस्‍कृतीची निदर्शक असते. मराठी लावण्‍यवतीचे वर्णन करणारी लावणी अस्‍सल मराठी आहे आणि शूर मर्दाचा पोवाडाही मराठीतच रचला अन् गायला जातो. वाचन संस्‍कृती हे नाशिकचे वैशिष्‍ट्य आहे. कुंभमेळा म्‍हणजे आत्‍मज्ञानाच्‍या देवाण-घेवाणीचा आनंद सोहळा असतो. आपण सर्वजण या साहित्‍याच्‍या कुंभ पर्वासाठी नाशिकमध्‍ये आला आहात. कुंभमेळ्‍यामुळे नाशिक जगाच्‍या नकाशावर आले. आता ते साहित्‍यिकांच्‍या ज्ञानपर्वामुळे भारताच्‍या आणि तंत्र क्रांतीमुळे जगाच्‍या नकाशावर दिसत असेल, असे मत छगन भुजबळ यांनी स्‍वागताध्‍यक्षीय मनोगताच्‍या वेळी व्‍यक्‍त केले.