९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाची परंपरा खंडित !

ग्रंथपूजन आणि दीपप्रज्वलन यांनी संमेलनाला प्रारंभ !

  • मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा हिंदुद्वेष जाणा ! – संपादक 
  • विद्येची उपासना नाकारणारे कधी भाषा आणि संस्कृती यांचे उत्थान साधतील का ? – संपादक 

नाशिक, ३ डिसेंबर (वार्ता.) – येथील ‘भुजबळ नॉलेज सिटी’मध्ये उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रजनगरीत ३ डिसेंबर या दिवशी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाच्या प्रारंभी विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीचे पूजन करण्यात येत होते; मात्र यंदाच्या संमेलनात ही परंपरा खंडित करण्यात आली. ग्रंथ पालखीतील ग्रंथांचे पूजन आणि दीपप्रज्वलन यांनी संमेलनाला प्रारंभ झाला. लोकहितवादी मंडळाच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

‘संमेलनाचा प्रारंभ श्री सरस्वतीपूजनाने आणि दीपप्रज्वलनाने होणार कि नाही’, याविषयी आयोजकांनी भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन श्री सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन करण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात श्री सरस्वतीपूजन करण्यात आले नाही. ‘ते का डावलण्यात आले ?’ याविषयीची भूमिका मात्र आयोजकांनी स्पष्ट केली नाही.

‘गर्जा जयजयकार’ गीताने ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन !

‘गर्जा जयजयकार’ या कुसुमाग्रजांच्या गीताने ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर आणि प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचे वाचन भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून गीतकार जावेद अख्तर आणि उद्घाटक म्हणून साहित्यिक विश्वास पाटील यांच्यासह कृषीमंत्री दादा भुसे, उद्योग, तसेच भाषा मंत्री सुभाष देसाई, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिक ठाले-पाटील, बडोदा येथील राजमाता शुभांगीनी राजे गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख मान्यवरांनी पाठवलेल्या संदेशांचे वाचन करण्यात आले.