भाजपच्या नेत्यांची नावे नसल्याने मराठी साहित्य संमेलनावर महापौर सतीश कुलकर्णी यांचा बहिष्कार !

भाजप नेत्यांची नावे जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप !

नाशिक – येथे ३ डिसेंबरपासून चालू होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेत भाजप नेत्यांची नावे नसल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलनावर बहिष्कार घातला आहे. ‘केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना साधे निमंत्रणही देण्यात आले नाही’, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘आमच्या नेत्यांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत’, असा आरोप त्यांनी केला असून ‘संमेलनाच्या ग्रंथदिंडी व्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थिती लावणार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.

सतीश कुलकर्णी

संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘ऑनलाईन’ उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये समारोप होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः मंत्री छगन भुजबळ यांसह इतर अनेक मंत्री संमेलनात उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे आधीच हे संमेलन ‘राजकीय’ झाले आहे, असा आरोप होत आहे.

साहित्य महामंडळाने राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलनात प्राधान्य द्यायचे नाही, हे यापूर्वीच ठरवले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संमेलनाचे निमंत्रणही देण्यात आले नाही. संमेलनासाठी निधी देणार्‍या भाजपच्या तिन्ही आमदारांचा निमंत्रण पत्रिकेत साधा उल्लेखही नाही. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिकेनेही संमेलनासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यानंतरही भाजप नेत्यांना डावलल्याने महापौर सतीश कुलकर्णी अप्रसन्न झाले आहेत.

मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे कथाकथन रहित !

डॉ. जयंत नारळीकर

नाशिक – अखिल भारतीय साहित्य संमेलनात थेट संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे कथाकथन रहित करण्यात आले असून केवळ संवाद कार्यक्रम होणार आहे. खरेतर संमेलनाचा अध्यक्ष स्वतः कथाकथन करणार, ही ऐतिहासिक गोष्ट होती; कारण आजवर असे कधीही घडलेले नाही.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे स्वतः साहित्यिक आहेत. जयंत नारळीकर यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या विज्ञानकथा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य असे अनेक कथासंग्रह त्यांच्यावर नावावर आहेत. स्वतः संमेलनाध्यक्षांनी ‘आपण साहित्य संमेलनात कथाकथन करणार आहे’, असे सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात तसे होणार नसल्याचे समजते. ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांचेही नाव अचानक काढण्यात आले आहे. यामुळे चित्रकारांमध्ये तीव्र अप्रसन्नता आहे. संमेलनात कोलते उपस्थितांशी संवाद साधून ‘स्लाईड शो’च्या माध्यमातून मार्गदर्शन करणार होते.