हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई जिल्ह्यात संपर्क दौरा झाला. या वेळी आमदार, खासदार, अधिवक्ता, उद्योजक, तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या भेटी झाल्या. या वेळी श्री. घनवट यांनी सनातनच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’विषयीही माहिती सांगितली. त्याला सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला. त्याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

१. गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची आवश्यकता ! – माजी आमदार संदीप नाईक, ऐरोली, नवी मुंबई.

‘गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे’, असे मत माजी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ज्ञानशक्ति प्रसार अभियानाच्या निमित्ताने नाईक यांची भेट घेतल्यावर ते बोलत होते. या वेळी श्री. घनवट यांनी नाईक यांना विशाळगडासह अन्य गडांची दुरवस्था आणि तेथे झालेले अतिक्रमण यांविषयी माहिती दिली. ज्ञानशक्ति प्रसार अभियानाच्या माध्यमातून सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचवल्याने समाजात कशी जागृती होत आहे ?, याविषयी माहिती दिली. तसेच मंदिररक्षणाविषयी समितीने केलेले कार्य, मिळालेले यश या संदर्भातील ध्वनीचित्रचकती दाखवली. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या निर्माण कार्याविषयी माहिती दिली. त्यावर संदीप नाईक यांनी गड-किल्ले संवर्धनासह अन्य कार्यातही साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी श्री. संदीप नाईक यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.

२. सनातनचे प्रबोधन करण्याचे कार्य कौतुकास्पद ! – प्रकाश बाविस्कर, संचालक, ‘बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनी’, नवी मुंबई

सनातन संस्थेच्या माध्यमातून जे आयुर्वेद आणि संस्कृती यांची जपणूक आणि प्रबोधन करण्याचे जे काम चालू आहे, ते कौतुकास्पद आहे. यामध्ये प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार सहभागी होणे आवश्यक आहे, असे उद्गार ‘बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनी’चे संचालक प्रकाश बाविस्कर यांनी काढले. श्री. घनवट यांनी त्यांना ज्ञानशक्ति प्रसार अभियानाविषयी अवगत केले, त्या वेळी ते बोलत होते.

३. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना सात्त्विकता आणि चैतन्य यांचे महत्त्व पटवून देणे महत्त्वाचे ! – कॅप्टन सुदर्शन गुप्ता, उद्योजक, नवी मुंबई.

संस्थेचे कार्य चांगले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना मंदिरांची सात्त्विकता आणि चैतन्य किती आहे ?, याचे महत्त्व पटवून देण्याचा विषय आवडला, असे उद्योजक कॅप्टन सुदर्शन गुप्ता यांनी सांगितले. श्री. घनवट यांनी त्यांची ज्ञानशक्ति प्रसार अभियानाच्या निमित्ताने भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते.

४. हलाल प्रमाणित सर्व उत्पादने बहिष्कृत करणार ! – श्री. दादा शेटकर, उद्योजक, बांद्रा  

उद्योजक दादा शेटकर यांना हलाल उत्पादनाविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या दुकानात हलालची उत्पादने बहिष्कृत करण्याचा संकल्प केला. त्यांनी एका ‘डिलर’शी संपर्क करून देऊन त्यांनाही याविषयी माहिती देण्यास सांगितले आणि हलालची उत्पादने असल्यास ती न घेण्याचे आवाहन केले. या वेळी ज्ञानशक्ति प्रसार अभियानात सहभागी होऊ शकतील अशा व्यक्तींचे संपर्क त्यांनी दिले.

५. हिंदूंवरील आघात थांबवण्यासाठी योगदान देणार ! – अधिवक्ता दिवाकर राय, मुंबई उच्च न्यायालय

धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे, हलाल प्रमाणपत्र यांसारखे विविध आघात थांबवण्यासाठी अधिवक्ता म्हणून योगदान देणे आणि या दृष्टीने संपर्क देण्याची सिद्धता अधिवक्ता दिवाकर राय यांनी व्यक्त केली. ज्ञानशक्ति प्रसार अभियानात योगदान देणार, असेही त्यांनी श्री. घनवट यांनी घेतलेल्या भेटीच्या वेळी सांगितले.

६. सनातनचा रामनाथी येथील आश्रम पहाण्यासाठी येणार ! – संजय पोतनीस, आमदार, कलिना, मुंबई. 

सनातनच्या रामनाथी आश्रमाविषयीचे माहितीपत्रक आणि त्या संदर्भातील माहिती पाहून आमदार संजय पोतनीस यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियानात सहकार्य करू’, असे आश्वासन आमदार श्री. संजय पोतनीस यांनी या वेळी दिले. या वेळी श्री. पोतनीस यांना ‘सनातन पंचांग २०२२’ देण्यात आले.

७. राष्ट्र आणि धर्म कार्यात सर्वतोपरी साहाय्य करू ! – खासदार गजानन कीर्तीकर, उत्तर-पश्चिम मुंबई

खासदार गजानन कीर्तिकर यांना सनातनचे पंचांग भेट देतांना श्री. सुनील घनवट आणि अन्य कार्यकर्ते

खासदार गजानन कीर्तीकर यांनी आपुलकीने सद्यस्थिती जाणून घेऊन सर्वोत्तोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी स्वीय साहाय्यक प्रकाश जोशी यांनी ‘बांगलादेश येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या संदर्भात गृह मंत्रालयात पत्र देऊ’, असे सांगितले. या वेळी खासदार गजानन कीर्तिकर यांना ‘सनातन पंचांग २०२२’  देण्यात आले.

८. स्वतःच्या वाचनालयात ग्रंथ ठेवून ज्ञानशक्ति प्रसार अभियानात सहभागी होणार ! – आमदार सुनील प्रभु, गोरेगाव

आमदार सुनील प्रभु यांना सनातनचे पंचांग भेट देतांना श्री. सुनील घनवट आणि अन्य कार्यकर्ते

ज्ञानशक्ति प्रसार अभियानाचा विषय ऐकल्यानंतर ‘स्वतःच्या वाचनालयापासून आरंभ करू’, असे आश्वासन आमदार श्री. सुनील प्रभु यांनी दिले आणि याप्रमाणे तेथील अधिकार्‍यांना संपर्क साधून भेटण्यास सांगितले. या वेळी आमदार सुनील प्रभु यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.

९. हिंदुत्वाचे जागरण करत रहाणे, ही काळाची आवश्यकता ! – संतोष धनावडे, शिवसेना, विधानसभा संघटक, कांदिवली पूर्व 

श्री. घनवट यांनी संतोष धनावडे यांच्याशी हलाल प्रमाणपत्र, हिंदुविरोधी आघात, लव्ह जिहाद अशा विविध विषयांवर चर्चा केली. समितीच्या विविध उपक्रमांची माहिती धनावडे यांनी या वेळी जाणून घेतली. या वेळी ज्ञानशक्ति प्रसार अभियानाची माहिती सांगितल्यावर त्यांनी ‘स्वतःसह अन्य कोठे कोठे याचे वितरण करू शकतो ?, याचा अभ्यास करून मागणी देतो’, असे सांगितले. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.

१०. ज्ञानशक्ति प्रसार अभियानात सहकार्य करू ! – आमदार सौ. मनीषा चौधरी, दहिसर  

आमदार मनीषा चौधरी यांना सनातनचे पंचांग भेट देतांना श्री. सुनील घनवट आणि अन्य कार्यकर्ते

श्री. घनवट यांनी घेतलेल्या भेटीच्या वेळी ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियानात सहकार्य करू’, असे आश्वासन आमदार सौ. मनीषा ताई चौधरी यांनी दिले. यावेळी त्यांना सनातन पंचांग देण्यात आले.