भारताचा अपमान करणार्‍या ‘वीर दास’ यांच्यासारख्या कलाकारांना कारावासाची शिक्षा द्या ! – सुनील पाल, प्रसिद्ध हास्य-कलाकार

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘हास्यकलाकार नव्हे, तर देशद्रोही’ ! या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

श्री. सुनील पाल

मुंबई – भारताच्या गौरवशाली गोष्टींविषयी सर्वांना अभिमान आणि आदर असायला हवा. अमेरिकेत जाऊन आपल्या भारताची अपकीर्ती करणारे वीर दास यांच्या वक्तव्यांची मी निंदा करतो. हास्य-कलाकाराचे काम निखळ विनोदातून लोकांना हसवणे असतांना देशाची अपकीर्ती करणे, अश्लील-गलिच्छ विनोद करणे, शिवीगाळ करणे, हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरणे, हा एक प्रकारचा वैचारिक आतंकवाद आहे. मोठ्यांचा सन्मान न करणार्‍या आणि सामाजिक मर्यादा न पाळणार्‍या अशा लोकांना हास्य-कलाकारच काय, तर कलाकार म्हणूनही मी मानत नाही. हे लोक समाजाचे शत्रू आहेत. देशाच्या शत्रूला जी शिक्षा दिली जाते, तीच शिक्षा त्यांना द्यायला हवी. त्यांना कारावासाची शिक्षा दिल्याविना ते सुधारणार नाहीत, असे रोखठोक प्रतिपादन मुंबई येथील प्रसिद्ध हास्य-कलाकार श्री. सुनील पाल यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समितीने २० नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या ‘हास्यकलाकार नव्हे, तर देशद्रोही !’, या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात ते बोलत होते.

या परिसंवादात मुंबई येथील ‘सॅफ्रन थिंक टँक’चे संस्थापक श्री. सिद्धांत मोहिते, कर्नाटक येथील पत्रकार श्रीलक्ष्मी राजकुमार, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु विधिज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या अमित सचदेवा यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ ३ सहस्र ७६१ जणांनी घेतला.


मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी विनोद  करण्याचे धाडस का केले जात नाही ? – सिद्धांत मोहिते, सॅफ्रन थिंक टँक, मुंबई

श्री. सिद्धांत मोहिते

‘भारतात दिवसा महिलेची पूजा होते आणि रात्री महिलांवर सामूहिक बलात्कार केला जातो’, असा दुष्प्रचार करणारे वीर दास एकटे नाहीत, तर यात ‘बॉलीवूड’मधील काही मोठी मंडळी सहभागी आहेत. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली होती. वीर दासच नव्हे, तर अग्रीमा जोशूवा, मुनव्वर फारूकी, कुणाल कामरा असे अनेक कलाकार आहेत, जे देवतांवर गलिच्छ विनोद करतात. हे लोक मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी विनोद करण्याचे धाडस का करत नाहीत ?


वीर दास यांच्यासारख्या व्यक्तींवर खटले प्रविष्ट करायला हवेत ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार, कर्नाटक

श्रीलक्ष्मी राजकुमार

हास्य-कलाकारांचे वर्तन पहाता ‘त्यांच्यावर उपचार करण्याची नितांत आवश्यकता आहे’, असे लक्षात येते. वीर दास यांनी जी वक्तव्ये केली आहेत, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणणे कितपत योग्य आहे ? अनेक वर्षे आपण (हिंदू) शांत राहिल्याने अशा प्रकारे अपकीर्ती केली जात आहे. वीर दास यांच्यासारख्या व्यक्तींवर खटले प्रविष्ट करून त्यांच्या विरोधात गांभीर्याने कारवाई करायला हवी. आपल्या देशातील महिलांचा अपमान करणारे वीर दास, एकप्रकारे स्वत:च्या मातेलाही त्याचप्रकारे तोलत आहेत, हे त्यांच्या (वीर दास यांच्या) लक्षात येत नाही.


हिंदु श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर कायदा करावा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, नवी देहली

श्री. नरेंद्र सुर्वे

भारतमाता, राष्ट्रपुरुष, हिंदूंच्या देवता, संत, धर्मग्रंथ, यांच्याविषयी विनोद करून लोकांच्या मनातील श्रद्धा अल्प करण्याचा हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. पूर्वी चित्रपट, नंतर वेब सिरीज आणि आता ‘स्टँड-अप कॉमेडी’ (एकपात्री विनोदी प्रयोग) अशा विविध माध्यमांतून राष्ट्रपुरुष, हिंदूंच्या देवता, संत, अन् धर्मग्रंथ यांचा अवमान केला जात आहे. नुकतेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘रामायण, भगवद्गीता यांसारखे धर्मग्रंथ आणि राम, कृष्ण आदी आपले राष्ट्रीय सन्मानस्थान असल्याने त्यांचा आदर राखण्यासाठी कायदा केला पाहिजे’, असे म्हटले आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की, केंद्र सरकारने हिंदु श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर कायदा करायला हवा. यापुढे देवता आणि श्रद्धास्थाने यांचा अपमान हिंदू सहन करणार नाहीत.

‘जेव्हा देव, देश आणि धर्म यांच्याप्रतीची अस्मिता जागृत होते, तेव्हा अशक्य गोष्टीही सहज साध्य होतात !’
– श्री. रमेश शिंदे, प्रवक्ते, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती